@maharashtracity

मुंबई: विदर्भातील (Vidarbha) झपाट्याने विकसित होत असलेली उद्योगनगरी अमरावती (Amravati Airport) येथील विमानतळ लवकरच पूर्ण होऊन सेवेत दाखल होईल यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने या विमानतळासाठी 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी 6.5 कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला (MADC) प्राप्त झाले आहेत. तर महाराष्ट्र शासन 23 कोटी रुपये देणार आहे. दरम्यान, पुणे – शिर्डी – नागपूर या विमानसेवेला येत्या 18 फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (Maharashtra Airport Development Authority) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर (Deepak Kapoor) यांनी ही माहिती दिली.

श्री कपूर यांनी सांगितले की, पुणे – शिर्डी – नागपूर ही विमानसेवा अलाइन्स एअरकडून (Alliance Air) सुरू करण्यात येत आहे. तर पुणे – औरंगाबाद – नागपूर सेवा 1 मार्च पासून सुरू होणार आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरु करणार असल्याचे दीपक कपूर यांनी यावेळी जाहीर केले.

कपूर यांनी पुढे असे सांगितले की, कोल्हापूर तसेच रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकारकडून मंजूर केला जाणार आहे.
शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारले जाणार आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी केलेले प्रयत्न व महाराष्ट्र सरकारने केलेल्या अर्थसहायातून येणाऱ्या तीन ते चार महिन्यात कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कपूर यांनी शिष्टमंडळाला दिली.

प्रारंभी, विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिविल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

या चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी (Lalit Gandhi) यांनी प्रामुख्याने कोल्हापूर (Kolhapur), उत्तर महाराष्ट्र, कोकण (Konkan), विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली.

औरंगाबाद (Auranganad Airport) विमानतळावरून नवीन रूट सुरू करणे, जळगाव विमानतळावरून (Jalgaon airport) विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे अशा विविध मागण्यांचा अभ्यास अहवाल सादर करून झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण केंद्र उभारून युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही गांधी यांनी सांगितले.

राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याची सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या सिविल एव्हिएशन (Civil Aviation) समितीचे सुनीत कोठारी यांनी या प्रसंगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्यवर्धित करामध्ये (VAT) कपात करून तो १ टक्के करावा असे सुचविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here