@maharashtracity

गार्डन, मैदाने खुली, संचारबंदी हटवली

लग्नाला २०० जणांच्या उपस्थितीला परवानगी

हॉल, नाट्यगृह, सिनेमागृह ५०% उपस्थिती

मुंबई: मुंबईत कोविडच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. त्यामुळे आता लग्नाला मोठ्या क्षमतेच्या हॉलमध्ये किमान २०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रम, स्विमिंग पूल, नाट्यगृह, सिनेमागृह याठिकाणी ५०% उपस्थिती दर्शविता येणार आहे. समुद्र चौपाट्या, मैदाने, उद्याने खुली करण्यात आली आहेत.

त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बच्चे कंपनीला आता उद्याने, मैदाने, चौपाटया यांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

मुंबईत कोविड रुग्णांची अचानकपणे वाढ झाल्याने राज्य सरकार व मुंबई महापालिकेने काही निर्बंध लादले होते. नागरिक व राजकीय लोक यांचा संपूर्ण लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता मुंबईत पूर्णपणे निर्बंध लादले नव्हते.

मात्र, कोविडच्या रुग्णसंख्येत ज्या प्रमाणे वाढ होत गेली त्याप्रमाणे पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाल्याने पालिकेने निर्बंधात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील जाचक ठरणारी रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. पर्यटन स्थळे, आठवडा बाजार सुरू करण्यात येणार आहे. थीम पार्क खुली होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here