वैद्यकीय शिक्षण संचालकांशी मार्ड संघटनेची चर्चा

@maharashtracity

राज्य सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले. यामुळे निवासी डॉक्टरांना खर्चासाठी कसरत करावी लागत आहे.

विद्यावेतनासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांच्यासोबत मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या पदाधिकाÚयांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

मध्यवर्ती मार्ड अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले कि, राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांचे गेले तीन महिने विद्यावेतन मिळाले नाही. जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे देखील वेतन मिळाले नाही.

काही डॉक्टरांनी शिक्षणासाठी तसेच वैयक्तिक खर्चासाठी कर्ज काढले असल्याने कित्येक डॉक्टरांना कर्जाच्या हफ्त्यांचे फोन येत आहेत. मात्र वेळेतच वेतन मिळत नसल्याने निवासी डॉक्टर हवालदिल झाले आहेत.

यावेळी निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत डीएमआरईचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली.

यात सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींनी निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच प्रलंबित असलेल्या जुन्या मागण्यांकडेही लक्ष वेधले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये अजूनही औषधांचा तुटवडा असून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगावे लागते.

यातून अनेकवेळा रुग्णांचे नातेवाईक व निवासी डॉक्टरांमध्ये बाचाबाची होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शासनाच्या बाँड संबंधित बोलताना वरिष्ठ डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा आग्रह निवासी डॉक्टरांनी केला. या चर्चेत डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून डॉक्टरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. म्हैसकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here