@maharashtracity

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली

पीओपी गणेशमूर्तीबाबत पालिका, मूर्तिकार, प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक

प्रशासन पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सकारात्मक

गणेशमूर्तिकार, महापौर, गटनेते यांना हवाय पीओपी मूर्तीला पर्याय

मुंबई: मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव (eco-friendly Ganesh festival) साजरा करण्यासाठी पीओपीच्या (POP) गणेशमूर्तीबाबत ठोस पर्यायी उपाययोजना दिल्याशिवाय पीओपीच्या गणेशमूर्तींवर सरसकट बंदी घालण्यास मूर्तिकार संघटना, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांनी विरोध दर्शविला.

महापौर, आयुक्त व सर्वपक्षीय गटनेते आदींनीही पीओपीला पर्याय देण्याबाबत आग्रह धरला. त्यासाठी केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे (Central Pollution Control Board) पाठपुरावा करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी जारी केलेली मूर्ती विसर्जन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Bombay High Court) स्वयंस्फूर्तीने (suo moto) दाखल केलेली जनहित याचिका (PIL) क्रमांक ३/२०२१ अन्वये ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महापालिका प्रशासनाने सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन बैठक घेतली

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) होते. तर अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्तिकार, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, संबंधित प्रशासकिय अधिकारी यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

या बैठकीत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच ‘निरी’चे अधिकारी, गणेश मूर्तिकार संघटनेचे मूर्तिकार प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

पीओपीला पर्याय द्या -: मूर्तिकार

पर्यावरणाला हानिकारक म्हणून जर पीओपीच्या गणेश मूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे व वापरणे आदिवर बंदी असेल तर पीओपीला लवकरात लवकर पर्याय सुचविण्यात यावा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्यायालय यांच्या आदेश व नियमावली यांचा आदर करून मुर्तीकार संघटनेने, जोपर्यंत पीओपीला पर्याय मिळत नाही तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे यावर सरसकट बंदी घालण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

वास्तविक, पीओपीच्या मूर्ती या हलक्या असतात. मातीच्या मूर्ती बनविण्याकरिता मोठ्या प्रमाणात मातीचा साठा व मोठी जागा आवश्यक आहे. मातीच्या मूर्ती सुकवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो.

त्याचप्रमाणे, या गणेश उत्सवावर मूर्तिकार, सजावटकार, मूर्ती विक्रेते आदींच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो याचाही विचार व्हायला हवा, अशी भूमिका घेत पीओपी मूर्तींवर सरसकट बंदी लादण्यात येवू नये, अशी भूमिका मूर्तिकार संघटनेतर्फे मांडण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची भूमिका

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनीही पीओपीच्या गणेशमूर्तीला योग्य पर्याय दिल्याशिवाय त्यावर सरसकट बंदी आणणे उचित नाही, असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला एक अनोखी परंपरा आहे. हा एक मोठा उत्सव आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालू नये. पीओपीमधील घातक रसायनांना पर्याय देण्याबाबत केंद्रीय शास्त्रीय समितीकडे विचारणा करण्यात यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी सुवर्णमध्य काढावा -: महापौर, गटनेते

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींवर सरसकट बंदी न आणता त्याला पर्यायी उपाययोजना सादर करण्यात यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा आणि पीओपी गणेशमूर्तीला योग्य पर्याय देऊन सर्वांच्या उपजीविकेचा सकारात्मक विचार करण्यात यावा. त्यासाठी पालिका विधी विभागाचा कायदेशीर सल्ला घेण्यात यावा, अशी भूमिका महापौर किशोरी पेडणेकर व सर्वपक्षीय गटनेते यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे तसेच मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठाने दिलेल्या आदेशांचा अवमान न करता परंतु गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मूर्ती घडविण्यावरच अनेक कुटुंबांची उपजिविका अवलंबून आहे याचा सांगोपांग विचार करुन पीओपीला योग्य तो पर्याय प्राप्त करण्याबाबत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार करावा. जेणेकरुन पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि सण – उत्सवांच्या प्रथा – परंपरा देखिल कायम राहतील, अशी भूमिका महापौर व गटनेते यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची महत्वाची भूमिका -: आयुक्त

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नीरी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची महत्वाची भूमिका आहे, असे मत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्दयांचा सकारात्मक विचार करुन अहवाल सादर करावा. कारण महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा राज्यातील एक मोठा उत्सव आहे. तसेच विषारी / जैवअविघटनशील रासायनिक / तैलिक रंगांना तसेच पीओपी, थर्माकॉल यांना पर्याय सुचवावा, असे आयुक्त यांनी म्हटले आहे.

जर मातीच्याच गणेशमूर्ती बनविणे अपेक्षित असेल तर पीओपीला योग्य पर्याय देण्याबाबत नीरी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी त्यांचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. तसेच महापालिकेच्या विधी खात्यामार्फत कायदेशीर सल्ला घेण्यात येईल, अशी भूमिका अति आयुक्त ( पूर्व उपनगरे ) अश्विनी भिडे यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here