स्टेट इकॉनॉमिक अहवालाची माहिती
मुंबई: राज्यात कोविड काळात (covid pandemic) मलेरिया दुपटीने (rise in maleria) वाढला असल्याची माहिती स्टेट इकॉनॉमिक अहवालात (Economic Survey report) नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार २०१९-२० या वर्षात ९ हजार ४९१ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर २०२०-२१ या वर्षात १३ हजार ४४२ रुग्ण तसेच २०२१-२२ या वर्षात १७ हजार ३६५ एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
दरम्यान, मलेरिया रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यू संख्या कमी आहे. मात्र रुग्णसंख्या पाहता राज्यातून मलेरिया उच्चाटनाच्या उंबरठ्यावर असल्याचेही स्पष्ट होत आहे.
मुुंबईत (Mumbai) लोकसंख्येच्या आणि घनदाट वस्तीच्या निकषावरुन मलेरिया रुग्णांची संख्या जेमतेम आहे. मुंबईत मलेरिया एन्डेमिक स्थितीत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईत २०१९-२० या वर्षात ४ हजार ३५७ रुग्ण आढळले. तर मृत्यू शून्य आहे. तसेच २०२०-२१ या वर्षात ५ हजार ७ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे.
२०२१-२२ वर्षात ५ हजार १९३ रुग्ण आढळले असून मृत्यू शून्य नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षातील राज्यातील मलेरियाच्या स्थितीवर बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr Pradeep Awate) यांनी सांगितले की, मलेरियाचा प्रसार स्थानिक घटकांवर अवलंबून असतो. यात पावसाचे प्रमाण तसेच दाट लोकसंख्येचा भाग असे येतात. मात्र राज्यातील मलेरिया स्थिती नियंत्रणात असल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील तीन वर्षाची स्थिती पाहता मुंबईत मलेरिया एन्डेमिक स्थितीत आला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. तर २०१० पासून मुंबईतील मलेरिया कमालीने कमी होत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील जमीन मालकांना मलेरिया प्रतिबंधात्मक कार्यक्रमात सहभागी करुन घेतले असून पावसाचे पाणी साचण्यास विरोध केला जात असल्याचे पालिका अधिकारी म्हणाले.