@maharashtracity

मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरून पकडण्यात येणाऱ्या भटक्या जनावरांना (stray animals) ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या पालिका पी/ उत्तर विभागातील मालाड ( प.) येथील गुरांच्या कोंडवाड्याचे (pinfold) नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका १० कोटी रुपये खर्चणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकित मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर पालिकेतील पहारेकरी भाजप (BJP) व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून (Congress) खरमरीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मालाड ( प.) रामचंद्र विस्तारित रस्ता वलनाई गाव येथील भूखंड क्र. ३०७/६६ (अ) ( भाग) या भूखंडावर पशुपालन कार्यलयाच्याअंतर्गत जनावरांना ठेवण्यासाठी कोंडवाडा अस्तित्वात आहे. मात्र आता या कोंडवाड्याचे नव्याने बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.

या कामाच्या अंतर्गत तळमजला अधिक दोन मजली कार्यालयीन इमारत आणि दवाखान्याकरिता इमारत, आजारी जनावरांसाठी एक छपरी, औषधासाठी एक छपरी, चाऱ्याकरिता छपरी, जनावरांसाठी आणखीन दोन छपऱ्या, शेळ्या – बकऱ्यांकरिता छपरी, जनावरांसाठी पाण्याची टाकी, दिव्यांग लोकांसाठी उतरंड आणि अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणी आदी कामे करण्यात येणार आहेत.

सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने या कामाच्या संरचनात्मक विश्लेषण आणि सिमेंट सलोह काँक्रीटचे संकल्पचित्राच्या कामाकरिता मे. पेडणेकर अँड असोसिएटस यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मे रिद्धी इंटरप्राइजेस या कंत्राटदारामार्फत पावसाळ्यासह पुढील १८ महिन्यात हे बांधकामे करण्यात येणार असून त्यासाठी पालिका कंत्राटदाराला १० कोटी ६६ लाख रुपये देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here