@maharashtracity

मुंबई: राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळी येथील किल्ल्याच्या (Worli fort) डागडुजीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी पालिका ६३ लाख ४९ हजार रुपये करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे किल्लेप्रेमी आहेत. त्याचप्रमाणे मंत्री आदित्य ठाकरे यांचेही वरळी येथील किल्ल्यावर प्रेम आहे. या किल्ल्याची गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी व या किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेने काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या किल्ल्याची शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी बारीक पाहणी करून त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक आराखडा तयार केला असून आता या कामासाठी निविदा मागवली होती. त्यानुसार मे. एम. देवांग कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम खूपच परिश्रमाचे असल्याने कंत्राटदाराने पालिकेने ठरविलेल्या अंदाजित खर्चाच्या ९% जास्त रक्कम ठरवली आहे. त्यामुळे पालिकेला ६३ लाख ४९ हजार रुपये खर्च येणार आहे. हे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे.

या वरळी किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचे ना-हरकत प्राप्त करण्यात आले आहे.

वरळी किल्ल्याबाबत माहिती

वरळी कोळीवाडा गावाच्या उत्तरेकडील टोकावर वरळीचा किल्ला आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी सन १५६१ मध्ये उभारला.

समुद्रमार्गे मुंबईत घुसखोरी करू पाहणाऱ्या शत्रूंवर, त्यांच्या जहाजांवर, समुद्री चाच्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा चांगला उपयोग होत असे. याच उद्देशाने हा किल्ला उभारण्यात आला होता. या किल्ल्यात एक विहीर, एक मंदिर आहे आणि किल्ल्यावरुन वांद्रे सागरी सेतू यांचे विहंगम दृश्य दिसते.

किल्ल्याची तटबंदी हे तोफांसाठीचे व्यासपीठ आहेत. हा किल्ला मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील माहिमच्या खाडीपासून (Mahim Creek) लक्ष्य वेधणाऱ्या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. ज्याच्या उत्तरेस माहिम किल्ला आणि वांद्रे किल्ला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here