Twitter: maharashtracity

नागपूर (विशेष प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांच्याकडून पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान ओघात मुंबईचा उल्लेख ‘कोंबडी’ असा झाला. तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत गदारोळ घातला. त्याला विरोधी सदस्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने गोंधळ झाला. पिठासीन अधिकारी समीर कुणावार यांना सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी दोनदा स्थगित करावे लागले.

मुंबई ही सोन्याची अंडे देणारी ‘कोंबडी’ आहे. ती कापून खायची का? असे शब्द भुजबळ यांच्या मुखातून ओघाने येताच भाजप सदस्या मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. हरकतीचा मूद्दा उपस्थित करीत भाजप सदस्य राम सातपुते आणि योगेश सागर यांनीही त्यांना साथ दिली.

मनीषा चौधरी म्हणाल्या की मुंबईला ‘कोंबडी’ म्हणणे हा मुंबईचा अवमान आहे. असे त्यांनी म्हणताच सभागृहात गदारोळ सुरू झाला. पुन्हा कामकाज चालू झाल्यावर भुजबळ यांच्याकडून मनीषा चौधरी यांचा एकेरी उल्लेख झाला. भाजप सदस्य योगेश सागर यांनी भुजबळ यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी केली. व्हिडिओ पडताळून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असेही सागर म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही काही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी सदस्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. व्हिडिओ पडताळून अध्यक्ष याबाबत भूमिका घेतील, असे पिठासीन अधिकारी कुणावार यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here