@maharashtracity
By मिलिंद माने
महाड (रायगड): अनेक वर्षापासून महाड (Mahad) तालुक्यातील सावित्री खाडी (Savitri Creek) प्रदूषणाचा प्रश्न अद्याप संपलेला नाही. महाड तालुक्यात पुर येऊन गेल्यानंतर ही सावित्री खाडी महाड औद्योगिक क्षेत्रातील केमिकलच्या पाण्याने फेसाळत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे आसपासच्या शेकडो गावांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या फेसाळणाऱ्या पाण्याकडे आणि दुर्गंधीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) नेहमी कानाडोळा करते. औद्योगिक क्षेत्रातून (industrial area) पाईपलाईनद्वारे खाडीमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यापासूनच (sewage water) हे प्रदूषण होत असल्याचे अनेक नागरिकांकडून आरोप केले जात आहेत.
खाडीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नक्की प्रक्रिया केली जाते की नाही यावर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
महाड औद्योगिक क्षेत्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत महाड तालुक्यातील सावित्री खाडीतील जल प्रदूषण आजपर्यंत कमी झालेले नाही. कधी पाणी रंगीबेरंगी तर कधी लाल तर कधी हिरवेगार तर कधी फेसाळत आहे. या खाडीत महाड औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक सांडपाणी सोडले जाते.
सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन नियोजनाप्रमाणे सुरवातीलाच आंबेत खाडीला जोडणे गरजेचं होते. परंतु, असे न करता तालुक्यातील ओवले या गाव हद्दीत सोडण्यात आली. त्यामुळे हे सांडपाणी भरतीच्या पाण्याबरोबर महाड शहरापर्यंत येऊन पोहचत आहे. त्या मुळे महाड तालुक्यातील संपूर्ण सावित्री खाडी नेहमी प्रदूषित राहिली आहे.
दासगाव ,केंबुर्ली ,वहूर ,टोल , दाभोळ , सापे, वराठी चिंभावे, तेलंगे, तुडील, जुई, कुंभले, सव, गोठे अशी अनेक गावे या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. तसेच या गावातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
“या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात कडधान्याची आणि भात शेती आहे. त्या शेतीमधून निघणारे भात आणि कडधान्य केमिकलच्या पाण्यामुळे नष्ट झाले आहेत. त्याचबरोबर आंबा पीकदेखील येत नाही. मच्छिमारी बंद झाली, या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. हे थांबले नाही तर काही दिवसातच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
- अहमदशेठ माटवणकर, माजी सरपंच, दाभोळ
“सध्याच्या परिस्थितीत सावित्री खाडीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मच्छिमारी बंद झाल्यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित विभागाने हे प्रदूषण त्वरित थांबवावे.”
- विनय पुरारकर, विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस