By संतोष मासोळे

@SantoshMasole

धुळे: जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा आज १५ जूनपासून बिना विध्यार्थ्याच्या किलबिलाटाशिवाय सुरू झाल्या आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शाळा ऑनलाइन सुरू झाल्या असून शिक्षक वृंद शाळेत उपस्थित राहिले असले तरी विद्यार्थी मात्र शाळेत आले नाहीत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चपासून शाळा बंद होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले होते, तर यंदा २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग ५० टक्के उपस्थितीनुसार सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर कोरोनाची दुसरी भयंकर लाट आल्याने परीक्षा न होता सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती देण्यात आलेली आहे.

आता १५ जूनपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा पद्धतीने शाळा सुरू होत आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० अशी शाळेची वेळ असेल. धुळे जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण २०१५ शाळा असून, त्या माध्यमातून साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतील.

ज्यांच्याकडे ऑनलाइनची सुविधा नाही, अशांसाठी शिक्षक प्रत्येक भागात जाऊन ४-५ विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना अभ्यास देतील. दर आठवड्याला त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करतील, तर ऑनलाइनचा अभ्यासक्रम व्हॉट्सऍप, दीक्षा ऍपच्या माध्यमातून दिला जाईल.

यासाठीही विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार केले जाणार आहेत. त्यावर दररोज अभ्यास दिला जाणार आहे. जोपर्यंत शासनाचे स्पष्ट आदेश येत नाहीत, तोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरु होणार नाही, असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी सांगितले.

आगीवाल शाळेत वृक्षारोपण

आज शाळेच्या पहिल्याच दिवशी धुळ्यातील डॉ गुलाबाचंद रुपचंद आगीवाल इंग्लिश मिडियम स्कुल च्या शिक्षकांनी शाळेत वृक्षारोपण करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात केली. सर्व विध्यार्थ्यांना ऑनलाइन वेळापत्रक आणि वृक्षारोपण करण्याचा व्हिडिओ पाठवून आप आपल्या घरी, परिसरात झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here