@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl scam) माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. चार – आठ – दहा दिवसात म्हणजे जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा. मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे, त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणार्‍यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे थेट आणि खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत सरकारला दिले.

पवार म्हणाले, ज्यावेळी ही बैठक झाली, त्यावेळचे इतिवृत्त, ज्या अधिकार्‍याने सही केली ते माध्यमांना देत आहे. जे कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यात माझे नाव आहे असे माध्यमातून बोलले जात आहे. परंतु त्या आरोपपत्रात नक्की काय आहे ते त्यांच्या पान नंबर सातवर आणि आठवर असेल, त्याची कॉपी तुम्हाला दिली आहे. म्हणजे जी चौकशी करणारी एजन्सी आहे ती कोर्टात काय मांडते आणि राज्य सरकारची त्यावेळी जी चर्चा झाली त्याची टिप्पणी, ते काय म्हणतात, त्या दोन्ही कॉपी बघा त्यात स्वच्छ भूमिका मांडलेली आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या पत्राचाळ प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त गृहनिर्माणचे (Housing) मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय होते अणि त्यांच्या सहीचे पत्र आव्हाड यांनी पत्रकारांसमोर ठेवले. बैठका घेऊन मध्यममार्ग काढणं, संवाद साधणं चुकीचं आहे का? असा सवाल करतानाच वेगवेगळ्या बैठकांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

याप्रकरणी चौकशी करा, आमचा विरोध नाही. मात्र पराचा कावळा करु नका. मी १९९० पासून आजपर्यंतचा साक्षीदार आहे. आपण हत्तीच्या मर्मस्थळावर घाव घातल्यावर हत्ती उसळतो, असं समाजाचं मत आहे. महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवार आहेत हे लक्षात ठेवा, असेही आव्हाड यांनी आरोपकर्त्यांना ठणकावून सांगितले.

जी कागदपत्रे सादर केली त्यात चौकशी करणार्‍या एजन्सीने काय म्हटले आहे त्याचे वाचनही आव्हाड यांनी यावेळी केले. पवार यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा काही लोकांचा डाव आहे. आम्ही बेछूट आरोप करत नाही. जी पक्षाची आणि पवारसाहेबांची भूमिका आहे ती देशाला आणि राज्याला माहित आहे. तुम्ही आरोप केलाय ना, भाजपचे अध्यक्षही काहीतरी म्हणाले आहेत. ताबडतोब चौकशी करा. अहवाल घ्या आणि हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर संबंधितावर काय कारवाई करणार हे जाहीर करा, अशी मागणीही आव्हाड यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here