@maharashtracity
९० टक्के पाण्याची बचत
२४ तास सुविधा
पालिका – खासगी सहभागातून सुविधा
मुंबई: मुंबईतील (Mumbai) गिरगाव चौपाटी येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई महापालिकेने (BMC) खासगी सहभागातून पर्यावरणस्नेही, ९०% पाणी बचत करणारे, महिला, पुरुष यांच्यासाठी २४ तास सौरऊर्जेवर चालणारे फिरत्या वाहनवरील शौचालय प्रथमच उपलब्ध केले आहे.
त्यामुळे गिरगाव चौपाटी (Girgaon chowpatty) परिसरात येणाऱ्या पर्यटकांना (tourists) मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, चौपाटीवर सध्या अस्तित्वात असलेल्या एकमेव सार्वजनिक शौचालयावरील ताण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
मात्र, या फिरत्या व अनोख्या शौचालयाची सुविधा पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे. या शौचालयाला मिळणारा प्रतिसाद बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. जर चांगला प्रतिसाद लाभला तर लवकरच मुंबईतील अन्यत्र असलेल्या चौपाटीवरही अशी सुविधा बहाल केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
स्वराज्य भूमी गिरगांव चौपाटीवर मंगळवारी या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका अनुराधा पोतदार, उप आयुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्त्या व सिटीझन्स ऍक्शन नेटवर्क (Citizen Action Network) संस्थेच्या पदाधिकारी इंद्राणी मलकानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत देश- विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. हे पर्यटक मुंबई शहर भागातील गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India), नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी आदी ठिकाणी आवर्जून भेट देतात. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर काहीतरी आधुनिक सुविधा देण्याच्या संकल्पनेमधूम मेसर्स व्हॅकमॅन सॅनिटेशन सोल्यूशन प्रा. लि. यांच्यावतीने सहा महिन्यांसाठी विविध सुविधांनी युक्त असे फिरते शौचालय उपलब्ध करण्यात आले आहे.
फिरत्या शौचालयातील सुविधा
या शौचालयात सौर उर्जेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संपूर्णपणे पर्यावरणस्नेही असे हे प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पुढील ६ महिने कार्यरत राहणार आहे.
यामध्ये, महिलांसाठी १ आणि पुरुषांसाठी १ असे एकूण २ शौचकुपची व्यवस्था आहे. असलेले हे प्रसाधनगृह एका वाहनावर स्थित आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी नेऊन प्रसाधनगृह सुविधा पुरविता येते.
प्रत्येक फ्लशमध्ये सुमारे सव्वा लीटर पाण्याचा उपयोग या शौचालयात होतो. त्यामुळे २०० लीटर पाण्याचा उपयोग करुन जवळपास १०० फ्लश करता येतात. सर्वसाधारण प्रसाधनगृहांमध्ये २०० लीटर पाण्यात २० फ्लश होतात. म्हणजेच प्रत्येक फ्लशमध्ये किमान १० लीटर पाणी वापरात येते. या हिशेबाने या निर्वात प्रसाधनगृहामध्ये तब्बल ९० टक्के पाण्याची बचत होते. या प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर उर्जेवर कार्यरत राहते. त्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे.
मेसर्स व्हॅकमॅन सॅनिटेशन सोल्यूशन प्रा. लि. यांच्यावतीने महानगरपालिकेला सदर फिरते निर्वात प्रसाधनगृह पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास विनामूल्य तत्त्वावर पुरविण्यात आले आहे