@maharaahtracity

धुळे: भूमिगत गटारींच्या कामांमुळे देवपुरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. यामुळे देवपूरातील नागरिकांची ससेहोलपट होत आहे. देवपूरातील रस्त्यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लागावा, याकरीता नूतन महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradip Karpe) यांनी रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत तातडीने संबंधित प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घ्यावी, अशी मागणी माजी आमदार कदमबांडे यांनी केली आहे. (Rajwardhan Kadambade demands to repair potholes)

राजवर्धन कदमबांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) माध्यमातून देवपूरात भूमिगत गटारींचे काम सुरु आहे. या कामांतर्गत रस्ते खोदून पाईप टाकले जात आहेत. मात्र, रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे देवपूरातील वसाहतींमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रहदारीसाठी त्यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

देवपूरच्या रहिवाशांना या रस्त्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे मणक्यांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवपुरातील वाडीभोकर रोड, दत्त मंदिर परिसर, जयहिंद कॉलनी, जीटीपी परिसर, नकाणे रोड, एसआरपी कॉलनी आणि आतील सर्व नागरी वसाहत असलेला भाग पूर्णपणे रस्त्यांमुळे विस्कळीत झाला आहे.

धुळेकरांच्या प्रेमामुळे मला त्यांनी दोनवेळा या शहराची आमदारकी दिली. धुळेकर नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी प्रत्यक्ष भेटून मला रस्त्यांबाबत तक्रारी दिल्या आहेत. त्यानंतर मी स्वत: प्रमुख कार्यकर्त्यांसोबत रस्त्यांची पाहणी केली. देवपुराचे विदारक दृश्य समोर आले. माझे मन हेलावून गेले.

जनतेला या त्रासापासून मुक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. रस्तारुपी संकटातून एक चांगले सुंदर, सुशोभित, सुसंस्कृत शहर निर्माण करण्याची सामुहिक जबाबदारी घेवून नूतन महापौर म्हणून कर्पे यांनी रस्ताप्रश्‍नी तातडीने संबंधित प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेवून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी कदमबांडे, साहेबराव देसाई, आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here