@maharashtracity
मुंबई: पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले या परिसरात महापालिकेच्या रस्त्यांखालील भागात असलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्याच्या घटनाप्रकारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. (thieves steals manhole covers)
एका लोखंडी वजनदार झाकणाची किंमत १२ हजार रुपये असून आतापर्यंत २० – २५ झाकणे चोरीला गेली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन हैराण झाले आहे.
या झाकणाची चोरी करणारे सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV) कैद झाले असून पालिकेने स्थानिक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारही केली आहे. मात्र, त्या झाकण चोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नसल्याने या चोरांना पकडणे कठीण झाले आहे.
मुंबईत भुरट्या चोरांना, गर्दुल्ले यांना चोरी करायला काही मिळत नसल्याने ते आता पालिकेच्या रस्त्याखालील भागात अंदाजे २० – २५ फूट खोलीवर असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांवर ठेवण्यात आलेल्या लोखंडी अवजड झाकणांची ते सर्रासपणे चोरी करीत आहेत.
मलःनिसारण वाहिनी स्वच्छ करण्यासाठी व नियमित तपासणी करण्यासाठी वाहिनीला ठराविक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकण दिलेले असतात. ही वाहिनी ही २० ते २५ फूट खोल असल्यामुळे चांगली सुरक्षितता असावी म्हणून मॅनहोलचे झाकण हे लोखंडी आणि मजबूत स्वरूपाचे असतात. एका झाकणाची किंमत अंदाजे बारा हजार रुपये इतकी असते.
अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी या परिसरातील मलनि:स्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. आतापर्यंत २० – २५ लोखंडी झाकणे चोरांनी पळवली आहेत.
विशेषतः अंधेरी एमआयडीसी परिसरात अधिक संख्येने झाकणं चोरीला गेली आहेत. या झाकणांची चोरी पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
एका लोखंडी झाकणाची किंमत १२ हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे आतापर्यंत किमान ३ लाख रुपयांपेक्षाही जास्त किंमतीच्या लोखंडी झाकणांची चोरी झाली आहे. या चोरून आणलेल्या लोखंडी झाकणांची चोरांना भंगारात विक्री केल्याने चांगली किंमत मिळते.
मॅनहोल उघडे राहिल्यामुळे त्या मॅनहोलमध्ये एखादी व्यक्ती पडून अथवा धावत्या वाहनांचे चाक अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच नवीन झाकण लावण्याची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात आली. मात्र, झाकण वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले.
संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे व सहार पोलिस ठाणे येथे अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यांना वेळोवेळी पत्राद्वारे देखील कळविण्यात आले आहे.