@maharashtracity

तीन देश हाय रिस्क श्रेणीत

परदेशी प्रवासाचा पूर्वोतिहासाची पडताळणी होणार

मुंबई: दक्षिण आफ्रिकेसह ११ देशात कोविडचा नवीन विषाणू ओमिक्रोन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहे.

या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार हाय रिस्क देश, त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची नोंद तपासणी, तसेच या प्रवाशांनी दोन्ही लस घेतलेली असावी. तसे नसल्यास ७२ तासांतील आरटीपीसीआर चाचणी केलेली असावी असे नव्या नियमावलीत नोंद करण्यात आली आहे.

तसेच प्रत्येक परदेशातून येणाऱ्या प्रवाशाच्या प्रवासाचा पूर्वोतिहास ही पडताळला जाणार आहे.

दरम्यान, हाय रिस्क श्रेणीत दक्षिण आफ्रिका (South Africa), बोत्स्वाना (Botswana) आणि झिंबाब्वे (Zimbabwe) या तीन राष्ट्रांची नोंद करण्यात आली आहे. त्या प्रमाणे हाय रिस्क श्रेणीतील राष्ट्राला गेल्या १५ दिवसात भेट दिली असल्यास त्यांना परदेशी विमान प्रवासाची कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे.

अशा उच्च जोखीम असलेले विमान प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी विमानतळावर व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि विविध चाचण्या करणे सोपे होणार आहे.

सर्व हाय रिस्क राष्ट्रातून आलेल्या हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या उतरल्या तात्काळ आर टी पी सी आर (RTPCR) चाचण्या कराव्या लागणार आहेत. तसेच सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quarantine) राहावे लागणार आहे.

त्यांची दुसरी आर टी पी सी आर चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर पुन्हा करण्यात येईल. या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळल्यास या प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

जर सातव्या दिवशी घेतलेल्या आर टी पी सी आर चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा उच्च जोखीम असणाऱ्यांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

परदेशातील भेटीचा पूर्वोतिहास : विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांने त्यांनी मागील पंधरा दिवसातील प्रत्येक देशभेटीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही सर्व माहिती सर्व एयरलाईन्सकडे देण्यात येणार असून यातून या प्रवाशांच्या पूर्वोतिहासाची पडताळणी करणे सोपे जाणार आहे.

प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदान्वये त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक असून तसे नसल्यास त्यांच्याजवळ आगमनाच्या ७२ तासाअगोदरचे आर टी पी सी आर निगेटिव अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here