पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस

@maharashtracity

मुंबई: हवामान खात्याने बुधवारपासून पुढील आठवडाभर राज्यातील कोंकण, मुंबईसह काही जिल्ह्यात ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास ढगांनी काळोख करीत गडगडाट केला. जोडीला वीजेचा कडकडाट झाला आणि मुसळधार पावसाच्या सरी बरसताच बेसावध मुंबईकरांची तारांबळ उडाली. सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वात जास्त मुसळधार पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र, रेल्वे वाहतूक सुरळीत होती.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शहर भागातील मलबार हिल, सीएसएमटी भागात १७ मिमी, पूर्व उपनगरातील मुंलुड येथे २८ मिमी, भांडुप – २७ मिमी, विक्रोळी -२६ मिमी, गवाणपाडा येथे २२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच, पश्चिम उपनगरातील अंधेरी (पूर्व) – ११ मिमी, मरोळ – ९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत गेल्या चार – पाच दिवसांपासून उष्णता जाणवत होती. ऑक्टोबर हिटचा अनुभव सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकरांना जाणवत होता. उकाड्याने हैराण मुंबईकरांना बुधवारच्या मुसळधार पावसाने काहीसे, ‘ठंडा ठंडा, कुल कुल’ केले. त्यामुळे उकाड्याने हैराण मुंबईकरांना काहीसे हायसे वाटले. तर छत्रीशिवाय घराबाहेर पडल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी कुठेतरी आडोसा घ्यावा लागणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्याच्या नावाने बोटे मोडली नसेल तरच नवल.

मुंबईत दरवर्षी चार महिने तरी पावसाळा असतो. फार फार तर सप्टेंबर अखेरीस अथवा काही दिवस अगोदर पावसाळा निघून जातो. मात्र, यंदा पावसाने जून महिन्यात खूप कमी बरसात केली होती. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याने तळ गाठल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांवर १० टक्के पाणी कपातीचे संकट लादले होते. सुदैवाने जुलै व ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने पाणीपुरवठा करणारे सात तलाव जवळजवळ ९८ टक्के भरले आहेत.

मात्र, मुंबईच्या दृष्टिकोनातून पाऊस सप्टेंबर अखेरपर्यन्त बरसणे व तलावांत वर्षभर पुरेल इतका म्हणजे १४,४७,३६४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे महत्त्वाचे असते. तर पुढील वर्षभर मुंबईकरांना पाणीकपातीशिवाय पाणीपुरवठा होऊ शकतो. तलावातील पाणीसाठ्याबाबतचा आढावा पावसाळा संपताच १ ऑक्टोबर रोजी पालिकेकडून घेण्यात येतो. त्यामुळे मुंबईकरांसाठी पावसाळा सप्टेंबर अखेरपर्यँत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गणेश विसर्जनाप्रसंगी पावसाबाबत अलर्ट हवे

हवामान खात्याने बुधवारपासून पुढील आठवडाभर मुंबई, कोंकण, सोलापूर, गोंदिया आदी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह राज्यात येत्या ९ सप्टेंबर रोजी म्हणजे अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यावेळी मुंबईत ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला तर त्याचा परिणाम विसर्जनावर व विसर्जन व्यवस्था पाहणाऱ्या पालिका यंत्रणेवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पालिकेने पुढील २४ तासांत हवामान खात्याचा पुन्हा एकदा अचूक अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपली यंत्रणा सज्ज ठेवणे व मुंबईकरांना, गणेशोत्सव मंडळांना ‘अलर्ट’ राहण्याबाबत पूर्वसूचना देणे गरजेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here