@maharashtracity
मुंबई: आगामी आठवड्यापासून राज्य सरकारी रुग्णालयातील कामा रुग्णालयात (Cama and Albless hospital) शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे तसेच उपकरणे मागवण्यात आली असून शस्त्रक्रियेसाठीची पूर्व तयारी करण्यात आली असल्याचे हि डॉ. पालवे म्हणाले.
दरम्यान, कोविड (covid) आता उतरणीला लागला असून सर जेजे समूह रुग्णालयातील कोविडेतर सेवा सुरळीत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यासह मुंबईत कोरोना संख्या घटत असल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक रुग्णालयातील नाॅन कोविड सेवा हळुहळू पूर्व पदावर येत आहे. यातून राज्य शासनाच्या मुंबईतील रुग्णालयांमध्ये नाॅनकोविड सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
यावेळी महिला तसेच बाल रुग्णांसाठी प्रसिद्ध असलेले ऑलब्लेस कामा रुग्णालयात शस्त्रक्रिया नियमित करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात कामा रुग्णालयात महिला रुग्ण दाखल होत होते. मात्र कोरोना स्थिती लक्षात घेता मोठ्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या.
ज्या रुग्णांवर औषधोपचाराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य आहे, अशा रुग्णांना कोविड परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर बोलवण्यात आले होते. आता मात्र कोविड नियंत्रणात आला असल्याने कामा रुग्णालयातील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मुंबईमधील कोविड उपचाराधीन रुग्ण संख्या घटत असल्याने सेंट जॉर्ज (Saint George) आणि जीटी रुग्णालय (GT Hospital) नॉन कोविड करण्याचा निर्णय झाला आहे. यात सुरुवातीला जीटी रुग्णालय नॉन कोविड होणार आहे. तर जे जे रुग्णालय (JJ Hospital) आधीपासून नॉन कोविड करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय सुरासे (Dr Sanjay Surase) यांनी सांगितले.