@maharashtracity
पालिकेचे ५०० कोटींचे नुकसान
मुंबई: मुंबईकरांवर पालिकेने (BMC) मालमत्ता करवाढीचे संकट लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यास सर्वपक्षीयांनी कडाडून विरोध केल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्थिगिती आदेश दिले. परिणामी आता मालमत्ता धारकांवरील करवाढीचे संकट टळले आहे. मात्र, त्यामुळे पालिकेला तब्बल ५०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
मुंबई महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी मालमत्ता करात (property tax) १४ ते २५ टक्के वाढ सुचवली होती. या करवाढीला पालिकेतील विरोधी पक्ष, सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पहारेकरीची भूमिका बजावणाऱ्या भाजपनेही (BJP) तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे या सर्वपक्षीय विरोधाची गंभीर दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, मालमत्ता करवाढ करण्याच्या प्रस्तावाला फेटाळून लावत करवाढिला स्थगिती दिली.
त्यामुळे पालिका प्रशासनाने मालमत्ता करवाढ सध्याच्या मालमत्ता धारकांना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही करवाढ मागे घेण्यात आल्याने पालिकेला या करवाढीद्वारे अपेक्षित असलेल्या ५०० कोटींपेक्षाही जास्तीच्या उत्पन्नावर नाईलाजाने पाणी सोडावे लागले आहे.