समुद्री वारे वेळेत आल्याने उष्णता घटली
@maharashtracity
मुंबई: मुंबई उपनगर तसेच शहरातील कमाल तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सिअस घट झाल्याने दिलासा मिळाला. मंगळवारी कुलाबा ३४.८ तर सांताक्रुझ ३७.५ डिग्री सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. वायव्य भारताकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांना शांत करणारे समुद्री वारे मंगळवारी वेळेत वाहू लागल्याने कमाल तापमानाचा पारा अलगद उतरला असल्याचे मुंबई वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले.
सुषमा नायर पुढे म्हणाल्या कि, गेले दोन दिवस वायव्य भारताकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्याला रोखणारा समुद्री वारा उशिराने म्हणजे दुपारी दीड वाजल्यानंतर वाहू लागला होता. त्यामुळे उष्मा वाढला होता. दररोज समुद्राकडून वाहणारे वारे दुपारी १२ नंतर वाहू लागतात. मंगळवारी मात्र त्याच वेळेत वाहू लागल्याने कमाल तापमानात घट झाली असल्याचे नायर म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, बुधवारचा दिवस परीक्षेचा असून तेव्हाही समुद्री वारे वेळेत प्रवाहित झाल्यास तापमान कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेले दोन दिवस उष्णतेसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला होता. मुंबई उपनगरात काही ठिकाणी कमाल तापमानाने चाळीशी पार केली होती. सोमवारी मुंबईतील तापमान ३९ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असताना मंगळवारी मात्र उपनगरात दोन तर शहरात पाच डिग्री तापमान घटले होते. तसेच शहरात ५४ तर उपनगरात २६ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली.
राज्यातील इतर ठिकाणावरील कमाल तापमान :
सोलापूर ३९.३, परभणी ३९.४, अलिबाग ३४.४, मालेगांव ३८.८, बारामती ३७.१, रत्नागिरी ३६.८, सातारा ३६.७, कोल्हापूर ३८.१, हर्णै ३२.५, अहमदनगर ३९.५, सांगली ३८.३, पणजी ३४.५, डहाणू ३४.३, नांदेड ३७.२, नाशिक ३७.१, जालना ३५.०, माथेरान ३६.४, चिखलठाणा ३७.८, पुणे ३७.५ डिग्री सेल्सिअस