@maharashtracity

दुकान गाळे आणि रहिवासी सदनिका विकण्यावर रहिवाशांचा वाढता कल

महाड (रायगड): महाडमध्ये दिनांक 22 जुलै रोजी आलेल्या महापुरामध्ये महाड शहर आणि तालुक्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते. महाड शहरातील पुराच्या पाण्याची पातळी कधी नव्हे ती जवळपास २० फुटापर्यंत पोहोचली. त्यामुळे अन्य भागातून नोकरीनिमित्त आलेल्या लोकांनी मात्र महाड सोडून जाण्याकडे कल वळवला आणि बहुतांश लोकांनी पहिल्या मजल्यावरील सदनिका आणि गाळे विक्रीस काढल्याचे ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरून दिसून येत आहे.

महाडमध्ये नोकरीनिमित्ताने आलेल्या अनेकांनी गड्या आपला गाव बरा असे म्हणत महाडमध्ये घेतलेल्या सदनिका विकण्यावर भर दिला आहे.

महापुरामुळे महाडकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या महापुरानंतर महाड शहर पुन्हा उभे राहते कि नाही प्रश्न होता. मात्र मोठ्या जिद्दीने महाडकर पुन्हा उभे राहिले.

शहरातील पाण्याची पातळी २० फुटापर्यंत गेल्याने दुकानातील आणि घरातील सामान भिजून खराब झाले. या पुरात व्यापारी वर्गाचे अब्जो रुपयांचे नुकसान झाले. महाड शहर पुन्हा कसे उभे राहील हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. उध्वस्त झालेले महाड शहर पुन्हा उभे राहणे सर्वांसमोर एक मोठे आव्हान होते.

महाराष्ट्रातून आलेली मदत आणि लोकांचे हात महाड पुन्हा उभे करण्यास महत्वाचे ठरले. महाड आता बऱ्यापैकी पूर्वपदावर आले आहे. यामुळे लोकांच्या मनातून पुराची भीती निघून गेली आहे. असे वाटत असले तरी पुन्हा असाच सामना करावा लागेल कि काय या भीतीतून मात्र महाडकर सावरलेले नाहीत.

महाडच्या बाजार पेठेत पुन्हा नवीन नवीन उद्योग सुरू केले जात आहेत. त्यामध्ये खाद्य पदार्थाची दुकाने, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहेत.

शहरातील बहुतांश भागात सध्या बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. मात्र, या इमारतीमधील सदनिकांना ग्राहक नसल्याने केवळ हातात घेतेलेले काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. महाडमध्ये जमीन घेताना देखील ताक फुंकून घेतली जात आहे. मात्र जागा विकत घेणारे देखील याठिकाणी पाणी आले होते का असा प्रश्न करूनच पुढील चर्चेला तयार होत आहेत.

शहरात अशीच स्थिती पुढील कांही वर्षात कायम राहिल्यास शहरातील आर्थिक गणित ढासळण्यास वेळ लागणार नाही. सद्य स्थितीत पहिल्या मजल्यावरील सदनिका आणि पार्किंग जागेत बांधलेले गाळे अनेकांनी विक्रीस काढले आहेत. याचे फलक जागोजागी दिसून येत आहेत. हे गाळे परराज्यातून आलेले व्यवसायिक घेत असल्याचे चित्र देखील पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here