maharashtracity

नेस्को कंपनीच्या दबावाखाली नेस्को कोविड सेंटर केले बंद

मुंबई: मुंबईत एकीकडे कोरोनावर नियंत्रण आले असले तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबतची चर्चा संपलेली नसताना गोरेगाव ( goregoan) येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर (nesco jumbo covid centre) फेज -२ चा महापालिकेने गाशा गुंडाळत ते बंद केले.

पालिका प्रशासन इतके तत्पर झाले की, पालिका आयुक्तांनी फाईलवर केलेली सही सुकण्यापूर्वीच जंबो सेंटर बंद करण्याच्या हालचालींना वेग आला.

राज्य टास्क फोर्सने (state task force) कोणतेही जम्बो कोवीड सेंटर (jumbo covid centres) बंद करू नयेत अशा सूचना दिलेल्या असतानाही सुसज्ज असे सेंटर बंद करण्यात आल्याने आश्चर्य़ व्यक्त केले जाते आहे.

त्यामुळे मात्र पालिका वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे.नेस्को कंपनीने कोविड सेंटरमधील हॉलचा ताबा घेत सदर कोविड सेंटरमधील कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय साहित्य सामग्री, वस्तू आदी बाहेर काढले आहे.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व रुग्णालये कमी पडू लागल्याने पालिकेने ठिकठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारले.

त्यामध्ये गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटरचाही समावेश होता. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांची मोठी सोय झाली. रुग्णांना चांगल्याप्रकारे उपचार देणे, त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले.

या नेस्को जम्बो कोवीड सेंटरमध्ये दीड हजार बेडची व्यवस्था होती. त्यापैकी १ हजार बेड ऑक्सिजनयुक्त होते. ७०० बेड हे ऑक्सीजन पाईप लाईनने जोडण्यात आले होते.

त्यासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे.

शिवाय तज्ज्ञांकडून तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने कोविड केअर सेंटर बंद करू नका, अशा सूचना राज्य टास्क फोर्सने केली होती.

गुरुवारी पालिका आयुक्त चहल (munciple commissioner iqbal chahal) यांनी सेंटर बंद करण्याच्या फाईलवर सही केल्यानंतर दुस-या दिवशी शुक्रवारी या सेंटरचा ताबा नेस्को कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात आले.

सेंटरमधील साहित्याचा इतर ठिकाणी वापर करणार

गोरेगाव येथील जम्बो कोविड सेंटर फेज – २ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या सेंटरमधील साहित्याचा वापर इतर ठिकाणी केला जाणार आहे. आवश्यक असेल तिथे हे साहित्य उपलब्ध केले जाईल.
-: सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here