@maharashtracity
मुंबई: बेस्ट उपक्रमाने १ सप्टेंबरपासून ४५ बसमार्ग अचानकपणे बंद केले तर काही बसमार्ग मध्येच खंडीत केले आहेत. त्यावर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य (Sunil Ganacharya of BJP) यांनी, प्रशासनाचा कडाडून निषेध व्यक्त करीत बेस्ट समितीचे कामकाज न करता बैठक तहकूब करण्याची मागणी सभा तहकुबीद्वारे केली. त्यास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठींबा देत बेस्ट प्रशासनाच्या मुजोरपणाचा निषेध व्यक्त केला.
बेस्ट उपक्रमाच्या (BEST) परिवहन विभागातील मुजोर अधिकाऱ्यांनी उद्दामपणा करीत बेस्ट बसमार्ग अचानकपणे बंद केले तर काही मार्गावरील बस वाहतूक चुकीच्या पद्धतीने वळवली.
विशेष म्हणजे या निर्णयाबाबत बेस्ट प्रशासनाने, बेस्ट समिती अध्यक्ष व सर्वपक्षीय सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही व त्यांचे मतही विचारात घेतले नाही. त्यामुळे बेस्टचे लाखो प्रवासी हैराण झाले आहेत. त्याचे तीव्र पडसाद सोमवारी पार पडलेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले.
बेस्ट उपक्रमाच्या नवीन वेळापत्रकाचा पुढील एका महिन्यात आढावा घेण्यात येणार असून गणेशोत्सवानंतर (Ganesh Festival) बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या दालनात प्रशासकीय बैठक घेण्यात येईल.
प्रवासी व सर्वपक्षीय सदस्यांच्या वेळापत्रकासंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्या तपासून त्यात जो काही बदल करायचा आहे तो १ नोव्हेंबरपासून करण्यात येईल, असे आश्वासन
बेस्टचे नवीन महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बैठकीत दिले.
त्यामुळे बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी, महाव्यवस्थापकांनी सविस्तर व सकारात्मक उत्तर दिल्याने सुनील गणाचार्य यांनी सभा तहकुबी मागे घ्यावी, अशी विनंती केली. त्यावर सुनील गणाचार्य यांनी सभा तहकुबी मागे घेतल्यानंतर बेस्ट समितीच्या पुढील कामकाजाला सुरुवात करण्यात आली.
बेस्ट बस मार्ग अचानक बंद करणे, ते मार्ग बदलणे, त्याचा लाखो बस प्रवाशांना झालेला त्रास पाहता आज बेस्ट समिती बैठकीत उमटलेल्या परिणामांतून बेस्ट उपक्रमाच्या डोक्यावर आज जे टांगत्या तलवारीचे निर्माण झालेले संकट होते ते आता काही दिवस पुढे सरकले आहे. त्यामुळे बेस्ट महाव्यवस्थापक व संबंधित अधिकारी यांना काहीसा दिलासा मिळाला.
- – -तर काँग्रेस आंदोलन छेडणार -: रवी राजा
बेस्ट समितीचे जेष्ठ सदस्य व पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा (Ravi Raja) यांनीही बेस्ट अधिकाऱ्यांच्या मुजोरपणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच, बेस्ट प्रशासनाच्या या चुकीच्या व संतापजनक निर्णयाचा लाखो बस प्रवाशांना नाहक त्रास होत असून त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी दोन बस बदली करून प्रवास करावा लागत असून त्याचा आर्थिक भुदंडही प्रवाशांना बसत आहे.
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. पण ज्यांनी एक डोस घेतला आहे त्यांना केवळ बेस्ट बसचा पर्याय खुला आहे. त्यातही बेस्ट प्रशासनाने अचानकपणे वेळापत्रक बदल करताना प्रवाशांच्या त्रासात अधिकच वाढ केली आहे. हे जाचक व त्रासदायक वेळापत्रक १५ दिवसात बदलले नाही तर मात्र काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रवी राजा यांनी दिला.