@maharashtracity

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्तांची ऑनलाईन उपस्थिती

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत बोगद्याचे काम पूर्ण

‘मावळा संयंत्र’द्वारे एका वर्षात बोगद्याचे काम पूर्ण

मुंबई: मुंबईतील रस्ते वाहतूक जलद, सुखकर होण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर उत्तम पर्याय ठरणाऱ्या आशिया खंडातील ‘कोस्टल रोड’ चे (coastal road) काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी पर्यंतच्या दोन बोगद्याच्या कामांपैकी पहिल्या बोगद्याचे काम सोमवारी दुपारी ३.५६ वाजता ‘मावळा’ (Mavla Tunnel Boring Machine – TBM) या संयंत्राद्वारे एका वर्षात पूर्ण करण्यात आले.

या कार्यक्रमाला ऑनलाईन सेवेद्वारे उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आणि कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, लोकप्रतिनिधी आदींनी बोगद्याचे काम योग्य पद्धतीने पार पडणाऱ्या संबंधित अधिकारी, अभियंते, कामगारांचे कौतुक केले.

बोगद्याचे काम एका वर्षात पूर्ण

प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी या बोगद्याच्या खोदकामाला ११ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपस्थितीत प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात करण्‍यात आली होती. या बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्‍पा ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. तर २ किलो‍मीटरचा टप्‍पा २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण करण्यात आला होता. पहिल्‍या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटरचे खोदकाम सोमवारी १० जानेवारी रोजी पूर्ण करण्यात आले.

Also Read: केवळ ३७ कोटींच्या कामांचा अनुभव असणाऱ्या कंत्राटदाराला १,४८२ कोटींचे घबाड!

‘कोस्टल रोड’ च्या कामाच्या अंतर्गत दोन बोगदे खोदण्यात येत आहेत. एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा आहे. या बोगद्याला अमरसन्स, हाजीअली व वरळी या तीन ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. ११ ठिकाणी दोन्ही टनेल एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आपतकाळात एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यात जाता येणार आहे. आता दुसऱ्या बोगद्याचे कामही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे.

मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा प्रकल्प -: मुख्यमंत्री

एखादे स्वप्न पाहणे, दाखवणे सोपे असते, मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात आणणं अवघड असते. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा हा प्रकल्प आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी’ बोगद्याचे काम पूर्ण करणाऱ्या टीमचे ऑनलाईन प्रणालीद्वारे कौतुक केले.

मावळा” या शब्दाला साजेसे काम यंत्र आणि ते यंत्र हाताळणारे माझे सहकारी करत आहेत कोस्टल रोडच्या कामात ऊन, वारा, पाऊस, कोविड असे अनेक अडथळे आल्याने प्रकल्प पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करून बोगद्याची दोन टोके समुद्राखालून जोडायचे अशक्य काम माझ्या टीमने हे काम करून दाखवले, याचा अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले.

युतीच्या सत्ताकाळात रस्ते वाहतुकीसाठी १९९५ साली मुंबईत युती शासनाने ५५ उड्डाणपूल बांधले. तेही आता कमी पडू लागल्याने कोस्टल रोडचे स्वप्न पाहिले. या प्रकल्पासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार असून तो नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण होईल, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

‘कोस्टल रोड’ मुंबईकरांसाठी अप्रतिम बाब -: आदित्य ठाकरे

‘कोस्टल रोड’ प्रकल्प व त्याअंतर्गत करण्यात आलेले पहिल्या बोगद्याचे काम हे मुंबईकरांसाठी अप्रतिम आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी ऑनलाईन भाषणाद्वारे केले.

मुंबईला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी कोस्टल रोड, रस्ते, मेट्रो रेल्वे आदी विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘कोस्टल रोड’ अंतर्गत बोगद्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण -: आयुक्त

मुंबईच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असलेल्या ‘कोस्टल रोड’च्या कामांतर्गत एका वर्षात एका बोगद्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. ‘कोस्टल रोड’चे १०० टक्के काम नियोजित वेळेतच पूर्ण होईल, असा आत्मविश्वास पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करून दाखवणार -: महापौर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या ‘कोस्टल रोड’च्या कामाअंतर्गत पहिल्या बोगद्याचे काम कोविड संकट काळातही नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे. या कामाचे आम्ही साक्षीदार असून त्याची इतिहासात नोंद होणार आहे.

त्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईकरांना जाते. जे योजले ते परिपूर्ण करून दाखवणार आहोत. मुंबईकरांना जे वचन दिले ते पूर्ण करीत आहोत. त्यामुळे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करून दाखवणार, असा आत्मविश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबईसाठी बहुउद्देशीय कोस्टल रोड प्रकल्प

आशिया खंडातील व भारतातील पहिल्या ‘कोस्टल रोड’ चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सध्या या ‘कोस्टल रोड’ चे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायचे आहे.

तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च असलेल्या १०.५८ किलोमीटर लांबीच्या या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते,पार्किंग, हिरवळ आणि दोन बोगदे यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, या प्रकल्पामुळे पश्चिम विभागातील हायवेवरील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागणार आहे. तसेच, प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधनाची मोठी बचत होणार आहे. पॅकेज ४ व पॅकेज १ चे कंत्राटदार मेसर्स लार्सन ऍड टुब्रो लिमिटेड (L & T) आहेत. तर पॅकेज २ साठी मेसर्स एचसीसी-एचडीसी (संयुक्त उपक्रम) (HCC -HDC joint venture) कंत्राटदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here