@maharashtracity
पिंपरी (पुणे): कोरोना कोविड -19 ची पहिली लाट कमी झाल्यानंतर प्रशासन सुस्त झाले होते. प्रशासनाच्या या गाफीलपणामुळे आणि समन्वयाचा अभाव असल्यामुळे दुस-या लाटेत अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याला सत्ताधारी भाजपच जबाबदार आहे. आतातरी कोरोनाची येणारी संभाव्य तीसरी लाट विचारात घेऊन नियोजन करावे. या लाटेत बालकांना बाधा होण्याची जास्त शक्यता आहे, त्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.
माजी आमदार विलास लांडे यांनी बुधवारी (दि. 12 मे) पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक संजय वाबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, रिपब्लीकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, कष्टकरी पंचायतचे बाबा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, सम्राट सेनेचे संतोष निर्सगंध आदी उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये पिंपरी चिंचवड शहरात अनेक नागरीकांचा बळी गेला. यातील अनेकांचा मृत्यू वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून झाला. ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड, व्हेंन्टीलेटर बेड वेळेत मिळत नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सीजन पुरवठ्यात नियोजनाचा अभाव, रुग्णालय व्यवस्थापन आणि मनपा प्रशासन यांचा समन्वय नसल्यामुळे हि आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. अशीच परिस्थिती संभाव्य तीस-या लाटेत येऊ नये म्हणून योग्य नियोजन आत्ताच केले पाहिजे. तीस-या लाटेत बालकांना जास्त संसर्ग होण्याचा धोका आहे. यासाठी मनपाने अशा अडीचशे संभाव्य रुग्णांचे केलेले नियोजन कमी पडेल आणि विपरीत हानी होऊ शकेल. हा धोका विचारात घेऊन योग्य नियोजन करावे अशी मागणी केली आहे.
रिपब्लीकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, खासगी रुग्णालयांनी शासनाने सांगितलेल्या दरपत्रकानुसार बिल आकारावे, तरी देखील खासगी रुग्णालय अवास्तव बिल आकारतात. याबाबत मनपाने अशा खासगी रुग्णालयांच्या बीलांची तपासणी लेखा अधिका-यांकडून करुन घ्यावी. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले की, यासाठी 26 कर्मचारी व अधिका-यांचे भरारी पथक नेमले आहे.
बाबा कांबळे म्हणाले की, मनपाच्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचा-यांप्रमाणेच दुध, भाजीपाला विक्रेते, रिक्षावाले यांच्यासह इतर कष्टकरी कामगारांनाही ‘फ्रन्ट लाईन वर्कर’ चा दर्जा देऊन त्यांचेही प्राधान्य क्रमाने लसीकरण करुन घ्यावे.
सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने चालविण्यात येणा-या सर्व रुग्णालयांमध्ये परिचारीका, लॅबटेक्निशीअन, एक्सरे टेक्निशिअनची संख्या कमी आहे. या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या जागा ताबडतोब भरुन वैद्यकीय सेवेवर येणारा ताण कमी करावा.
सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध म्हणाले की, लॉकडाऊन काळात गोरगरीब जनतेला मनपाच्या वतीने तीन हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहिर केले. परंतू त्यासाठी अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. म्हणजेच हि योजना फसवी आहे. अद्यापपर्यंत कोणालाही या योजनेचा लाभ मिळाला नाही.
आयुक्त राजेश पाटील यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भुमिका घेतली असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी यावेळी सांगितले.