@maharashtracity

शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी

मुंबई: राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरु करण्याबाबत निर्णय शालेय शिक्षण (school education department) विभागाकडून जारी करण्यात आला असून विद्यार्थी आणि शिक्षक याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. यातही काही मर्यादा ठेवल्या असून ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

दरम्यान ग्रामीण भागात कोरोना (corona) संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर सारख्या रूग्ण संख्या असणाऱ्या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिला आहे.

तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आदी रूग्ण संख्या घटत जाणाऱ्या जिल्ह्यात शाळा खुली करण्याचा निर्णय आयुक्त घेणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी देखील कोविड सद्य स्थिती विचारात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यास सुचविण्यात आले आहे.

दक्षता समिती स्थापन करणार

दिनांक २ ऑगस्ट रोजीच्या ब्रेक द चेन (break the chain) मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार त्या त्या ठिकाणावरील कोविड परिस्थिती विचारात घेवून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांना अधिकार देण्यात आले आहेत. असे असले तरी देखील दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे निर्णयात स्पष्ट म्हंटले आहे.

दरम्यान, शाळा सुरु करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर समिती तयार करण्यात येणार असून त्या समितीने शाळा सुरु करताना दक्षता घ्यायची असल्याचे शासन निर्णयात सुचविण्यात आले आहे.

या सोबत कोविड नियमानुसार जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा असावी, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे असे नियम सुचविण्यात आले आहेत.

तर विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.

मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. शिक्षकांचे वास्तव्य त्याच शहरांत असावे. अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे

१) शाळा सुरु करण्यापूर्वी १ महिना संबंधित शहरात वा गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी असावा.
२) शिक्षकांचे लसीकरण आवश्यक आहे. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
३) गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात पालकांना प्रवेश निषिद्ध.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here