@maharaahtracity

मुंबई महापालिका शिक्षण खात्याचे प्रभारी अधिकारी राजू तडवी यांची माहिती

शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे १००% लसीकरण होणार

संपूर्ण शाळेत सॅनिटायझर फवारणी होणार

सध्या ७३% शिक्षकांचे लसीकरण पूर्ण

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी झालेला आहे. त्यामुळेच राज्य शासनाने राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश दिला आहे. मात्र मुंबईत पालिका आयुक्त व विद्यार्थ्यांचे पालक यांच्या संमतीनंतरच इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पालिका आयुक्त इकबाल चहल यांना, पालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरू कराव्यात की नाही याबाबतचा एक प्रस्ताव सोमवारी देण्यात येणार असून त्यावर आयुक्त काय निर्णय घेणार, हे कळू शकणार आहे.

पालिका आयुक्त यांनी, शाळा सुरू करण्याबाबत मंजुरी दिली तरच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. आपल्या पाल्याला म्हणजेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवायचे की नाही याबाबतचा निर्णय हा संपूर्णपणे पालकांवर सोडून देण्यात आला आहे. (patents will take decision about reopening of offline school)

पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचा निर्णय घेतला तर तसे लेखी संमतीपत्र घेण्यात येणार असून ते बंधनकारक असणार आहे. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला तरी अशा विद्यार्थ्यांना ‘ ऑनलाईन’ पद्धतीने शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका शिक्षण खात्याचे प्रभारी अधिकारी राजू तडवी यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात काय तर शाळा सुरू होऊन शाळेची घंटा वाजणार की नाही हे पालिका आयुक्त व पालकांच्या निर्णयावर अवलंबून आहे.

मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा पूर्ण विचाराअंतीच घ्यायचा आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपासून अद्यापतरी शालेय विद्यार्थी हे बचावले आहेत. त्यांना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका बसता कामा नये, अशी भूमिका राज्याचे पर्यावरण , पर्यटन व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केली होती.

७३% शिक्षकांचे लसीकरण पूर्ण, पालिका सज्ज

मुंबईत इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पालिका शिक्षण खात्याने तशी तयारी सुरू केली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांचे १००% लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या ७३% शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा सुरू करण्यापूर्वी सर्वच शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे. ८ ते १० वी च्या २५० पेक्षाही अधिक शाळांचे सॅनिटायझेशन दोन दिवसांत करण्यात येणार आहे.

शाळा सुरु झाल्यावर शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग, प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत मास्क वाटप करण्यात येणार आहे, असेेे शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

दिनांक ४ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे निर्देश राज्य शालेय विभागाने दिले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने पालिकेने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा प्रस्ताव तयार असल्याचे अधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

कोरोना त्रिसूत्रीची कडक अंमलबजावणी

शाळा सुरू झाल्यावर शाळेत हात स्वच्छ करणे, सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीबाबत कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व तो वाढणार नाही, याबाबत पालिका शिक्षण खात्यामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.

पालिकेच्या सुमारे २५० शाळांच्या इमारतींत आठवी ते दहावीपर्यंतचे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर एकूण दहा हजार शिक्षकांसह कर्मचारीदेखील आहेत.

पालिका शाळांची सद्यस्थिती

पालिकेच्या एकूण शाळा – १,१८७
विद्यार्थी संख्या – २,७८,४९८
शिक्षक संख्या – १०, ४२०
शाळांची संख्या – ४०० इमारती

सर्व शिक्षकांचे होणार लसीकरण – महापौर

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्य़ाने राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here