By जितेंद्र आव्हाड
@Awhadspeaks
मा. मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, आणि मा.श्री. शरद पवार यांच्या उपस्थितीत, मंगळवार २७ जुलै २०२१ या दिवशी मुंबईमधील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्वसनाच्या (Redevelopment of BDD Chawl) प्रकल्पाला जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा मुंबईच्या (Mumbai) इतिहासात एक नवं पर्व सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा गृहनिर्माण मंत्री (Housing Minister of Maharashtra) म्हणून माझा त्याला हातभार असेल, यासारखा काव्यात्मक न्याय मिळेल असे माझ्या आयुष्यात मला कधी वाटले नव्हते.
ताडदेवच्या (Tardeo) एका चाळीत (श्रीपत भवन) लहानाचा मोठा होताना चाळीच्या जीवनातील बरे – वाईट पैलू मी भरपूर अनुभवलेत. बाजूला असलेली टाटा कॉलनी (Tata Colony) आणि तिच्याबद्दलची असूया …….चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं. तिथं घराचे दरवाजे जसे सताड उघडे असतात, तसेच शेजारंच्या मनाचेही. रक्ताचे नातेवाईक देणार नाहीत एवढा प्रेम, जिव्हाळा चाळीत मिळतो. पण त्याची किंमत वेगळ्याप्रकारे मोजावी लागते. मग ती नळावरच्या भांडणात असो, शेजारी चालणाऱ्या अंथोनीच्या हातभट्टीच्या अड्ड्यात असो, बाजूला चालणारा जानी शेटचा क्लब म्हणजे जुगाराचा अड्डा असो की विष्ठेने भरलेल्या तुंबलेल्या सार्वजनिक संडासात असो. या कडू गोड आठवणी आजही माझ्या मनातून जात नाहीत. हा ईश्वरी संकेत असावा किंवा मा.पवार साहेबांची दूरदृष्टी असावी, मला गृहनिर्माण खातं मिळालं.
वास्तविक गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India), राजाबाई टॉवर (Rajabai Tower), मुंबई विद्यापीठ (Mumbai University) किंवा छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस (CSMT). या इमारतींना जशी एक परंपरा आहे, तशीच ती बी. डी. डी. चाळींनासुद्धा आहे. आश्चर्य वाटेल, पण मुळात ब्रिटिशांनी (British) १९२० च्या सुमारास या चाळी बांधल्या त्या पहिल्या महायुद्धातील युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी. दरम्यान, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून स्वातंत्र्यानंतर हजारो कुटुंबं पोटासाठी मुंबईत येत होती. युद्धकैदी परत गेल्यानंतर या कुटुंबांना इथे आसरा मिळाला.
दारिद्र्याने गांजलेल्या, पण तरीही जीवनाशी संघर्ष करणाऱ्या मराठी माणसाचा झुंझारपणा यांचे प्रतिक म्हणजे या चाळी आहेत. १९४२ ची चलेजाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा (Samyukt Maharashtra Movement), डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य (Dr Babasaheb Ambedkar), दलित पँथरचा (Dalit Panther) उठाव, गिरणी कामगारांचा संप, अशा अनेक ऐतिहासिक घटना या चाळीणी पाहिल्या आणि त्यात त्या तन, मन, धनाने सामील झाल्या.
हे कितीही रोमांचक वाटत असलं, तरी तिथला जगण्याचा स्तर कधी उंचावला नाही आणि चाळींच्या प्लास्टरसारखाच तो दिवसेंदिवस ढासळत गेला, ही सुद्धा नागडी वस्तुस्थिती आहे.
एकूणच मुंबईच्या चाळींमध्ये राहणारे लोक मोठ्या घरांच्या गरजेपायी ठाणे (Thane), दहिसर (Dahisar), मानखुर्दच्या (Mankhurd) पलीकडे फेकले गेले. मुंबईतून हद्दपार झालेल्या या लाखो मराठी माणसापैकी मी सुद्धा एक! पण मुंबईचं मराठीपण आणि तिचा लढवय्या इतिहास नव्या स्वरूपात जतन करायची जबाबदारी नियतीने माझ्यावर टाकली. हाती घेतलं ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय सोडायचं नाही, ही पवार साहेबांची शिकवण आठवून कामाला लागलो.

नायगावच्या (Naigaon) ४२, एन.एम.जोशी मार्गावरील ३२ आणि वरळीच्या (Worli) १२१, अशा १९५ बी.डी. डी.चाळी पुनर्विकसीत होतील अशी योजना मी आखली. पवार साहेबांचा (NCP President Sharad Pawar) आशीर्वाद तर होताच, पण १००% हाडाचे मुंबईकर असलेले मुख्यमंत्री मा. उद्घव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीसुद्धा माझ्या योजनेला मंजुरी दिली.
गेली २५-३० वर्षे या चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा चालू होत्या. बरेच नारळ फुटले. पण प्रत्यक्षात काहीएक झालं नाही. इथले रहिवासी वर्षानुवर्षे फक्त पुनर्विकासाची स्वप्नं पहात दिवस काढत होते. गरिबांच्या प्रश्नांना कोण प्राधान्य देणार? मी आत्मस्तुती करत नाही आहे. पण पोलिसांच्या घरांचा (Police Housing) प्रश्न मार्गी लावताना, किंवा चाळीतल्या विविध संघर्ष संघटना ह्यांची समजूत काढून या चाळींसाठी ठोस योजना आखून ती कृतीत उतरवणं हे जिकिरीचं काम होतं. पण ईच्छा असते तिथे मार्ग असतो याचा प्रत्यय मला आला. माझे सर्व सहकारी सुद्धा त्यासाठी खूप राबले.
बी. डी. डी. चाळकऱ्यांना आता, मुंबईतून परागंदा व्हावं लागणार नाही की त्याच कुबट वातावरणात जगावं लागणार नाही. प्रत्येक घरात शौचालय, न्हाणीघर, नळ अशा सुविधा असलेलं, त्यांच्या विद्यमान घरापेक्षा खूप प्रशस्त असं घर, त्यांना महविकास आघाडी सरकारतर्फे (MVA Government) मोफत मिळणार आहे.
मी अनुभवलेला घाण संडासांचा, पोटात मळमळ आणणारा दुर्गंध, जिन्यांमधला कोंदट वास हद्दपार होईल. मराठीपण, त्याचा लढवय्या इतिहास, आणि त्याच्या साक्षीदारांच्या पिढ्या तिथे दिमाखात जगतील!
©️ डॉ. जितेंद्र आव्हाड