@maharashtracity

पोलिसांच्या सतर्कतेने सामाजिक तेढ निर्माण होण्याचा प्रसंग टळला

धुळे: धुळे शहरातील चाळीसगाव-मालेगाव रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) पुतळ्याला असलेल्या संरक्षण कठड्याचे लोखंडी भाले चोरी करताना शहर पोलिसांनी एकाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 64 हजार रुपये किंमतीचे 128 लोखंडी भाले हस्तगत केले. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

मनपा बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता हेमंत पावटे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एक इसम शिवस्मारकाच्या संरक्षक कठड्यावरील लोखंडी भाले हातोड्याने तोडत असताना एका जागरुक नागरिकाला दिसला आणि त्याला त्याचा संशय आला.

त्याने लागलीच शहर पोलिसांना कळविल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पथकासह दाखल झाले. अधिक चौकशीत तो इसम हे लोखंडी भाले तोडून चोरुन नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत त्याने हातोड्याच्या साहाय्याने एकूण 128 भाले तोडले होते. त्यांची किंमत 64 हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून हे तोडलेले 128 भालेही जप्त केले आहेत.

पोलिसांनी (Dhule Police) ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव नजीरे आलम शम्मी मोहम्मद शाह उर्फ गुड्ड्या रा.भंगार बाजार, ऐंशीफुटी रोड, धुळे असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत चोरट्याला तातडीने गजाआड केल्याने संभाव्य सामाजिक तेढाचा प्रसंग टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here