२ हजार ३८१ वाहनधारकांना बजावली नोटिस
३७९ जणांनी स्वतःहून हटवली वाहने
जप्त बेवारस वाहनांचा लवकरच करणार लिलाव
@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून गेल्या एका आठवड्यात रस्त्यालगत बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या व वाहतुकीला अडथळा ठरलेल्या २ हजार ३८१ वाहनांच्या (unclaimed vehicles) मालकांना नोटिसा बजावल्या. त्यापैकी ३७९ जणांनी स्वतःहून आपली वाहने हटवली. तर ७८२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त वाहने मालकांनी वेळीच दंडात्मक शुल्क भरून सोडवली नाहीत तर त्या सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
या लिलावातून प्राप्त होणारी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविडचा संसर्ग (covid pandemic) सुरू आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबईत पहिली, दुसरी व तिसरी लाट येऊन गेली. तिसऱ्या लाटेनंतर आता कुठेतरी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र या दोन वर्षांच्या कालावधीत काही वेळा कठोर निर्बंध घातल्याने अनेक कंपन्या, रोजगार, उद्योग बंद पडले. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले.
या कोविडचा मोठा आर्थिक फटका वाहनधारकांनाही बसला. परिणामी मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत अनेक वाहने आजही बेवारस अवस्थेत अशीच पडून आहेत. त्यांच्या मालकांनी त्या वाहनांकडे लक्षच दिलेले नसल्याचे दिसून येते.
मात्र, या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांच्या आदेशाने पालिकेने वाहतूक पोलिसांच्या (traffic police) मदतीने बेवारस वाहनांवर कारवाईचे पाऊल उचलले.
ज्या ज्या ठिकाणी रस्त्यालगत बेवारस वाहने आढळून येत आहेत, अशा २ हजार ३८१ दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या मालकांना, चालकांना गेल्या आठवड्यात वाहन हटविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही ठराविक मुदतीत ही वाहने त्या जागेवरून न हटविल्यास ती वाहने मनुष्यबळ, यंत्रसामग्री वापरून टो करून त्या जागेवरून हटवून जप्त करण्यात येत आहेत.
२ हजार ३८१ वाहनधारकांना नोटीसा बजावल्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने जप्त करून उचलली आहेत. उर्वरित वाहनांबाबत कार्यवाही सुरू आहे.
वास्तविक, रस्त्यांवरील बेवारस वाहनांबाबत नागरिकांकडून पालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांच्यासह सर्व परिमंडळांचे उप आयुक्त, सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), वरिष्ठ पोलीस निरिक्षक (वाहतूक) यांच्यासह इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
आतापर्यंत जप्त बेवारस वाहनांचा १५ दिवसात लिलाव करण्याचे व पालिका सहाय्यक आयुक्त यांनी यापुढे जप्त वाहनांसाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले. तसेच, उपायुक्त चंदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेवारस वाहनांवर पुन्हा एकदा नव्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.