@maharashtracity

८० डॉक्टरांना संसर्ग होऊ नये म्हणून ऑनलाईन कोर्सची होतेय मागणी

मुंबई: मुंबई सायन येथील सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट (Central Labour Institute) या केंद्रीय श्रम संस्थेकडून असोसिएट फेलो इन इंडस्ट्रियल हेल्थ (Associate Fellow in Industrial Health – AFIH) या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या 80 पैकी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. एक डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने उर्वरित डॉक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.

एएफआयएच या संस्थेत तीन महिन्यांचा पदविका कोर्स सुरु आहे. या कोर्समध्ये भारतभरातील डॉक्टर प्रतिनिधींनी प्रवेश घेतला आहे. असे ८० एमबीबीएस डॉक्टर सायन येथील प्रशिक्षण केंद्रात रोज प्रशिक्षण घेत आहेत.

आधीच कोविड रुग्णसेवा करुन आलेले डॉक्टर, त्यात ज्येष्ठ डॉक्टरही कोर्समध्ये सहभागी आहेत. यामुळे हा कोर्स ऑनलाईन करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.

दरम्यान, तिसऱ्या लाटेची (third wave of covid) शक्यता वर्तविण्यात येत असून या लाटेला अनुषंगून कोर्स होत असलेल्या ठिकाणी सोय नसल्याची तक्रार हे डॉक्टर मांडत आहेत. यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी सर्व डॉक्टरांनी हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावा असे लेखी पत्र, तसेच ईमेल संबंधित विभागाला आणि केंद्रीय लेबर मंत्रिमंडळासह मुंबई महानगरपालिकेला पाठविले.

या कोर्सच्या पत्रात डॉक्टर ऑनलाइन मागणी करतील त्यांना ऑनलाइन पद्धतीने क्लास द्यावा असे स्पष्ट लिहिले असताना देखील कोरोना महामारी स्थितीत डॉक्टर प्रतिनिधींना वेठीस धरले जात असल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे.

या कोर्ससाठी मुंबईत आलेल्या डॉक्टरांपैकी हैदराबादमधील (Hyderabad) डॉक्टरला शारीरिक त्रास होण्यास सुरुवात झाली. अखेर हैदराबादला घरी जाऊन कोरोना विषाणू चाचणी केली असता, ती चाचणी दुर्दैवाने पॉझिटीव्ह आली, आणि त्यामुळे सर्व डॉक्टर मंडळी तसेच त्याठिकाणी काम करणारा अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शिवाय ही केंद्रीय लेबर संस्था असून याठिकाणी कुठलाही कोरोना प्रतिबंधक उपाय केले जात नाही. थर्मल तपासणी, ठराविक अंतरावर बैठक व्यवस्था, पाण्याची सोय नसल्याचे कोर्सला आलेले डॉक्टर सांगतात.

येथील एक डॉक्टर हे करोना संक्रमित झाले असून डॉक्टरांचे एकत्र वर्ग, जेवण, प्रवास होत असल्याने इतर डॉक्टर मंडळी यांचे आणि त्यांच्या परिवाराचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. याला फक्त डी जी चा मनमानी कारभार हाच जबाबदार असून त्यांच्यावर केंद्र आणि राज्य सरकारने एपीडिमिक कायदा नुसार कारवाई करावी.

तसेच आता तरी ऑनलाइन वर्ग सुरू करावेत अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नितु पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here