मनपा आयुक्त निर्णय घेतील

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत आश्‍वासन

जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले

@maharashtracity

मुंबई: जोगेश्‍वरीतील जनतेच्या मागणीनुसार जोगेश्‍वरी (पूर्व) पूनमनगर येथील मजास मंडईत मुंबई महानगरपालिकेचे के उत्तर हे नविन कार्यालय सुरू करण्यासाठी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर (Shiv Sena MLA Ravindra Waikar) यांचा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना मंजुरी दिली आहे.

ट्रॉमा हॉस्पिटल येथे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रासाठीचे स्वतंत्र मनपा कार्यालय बांधून होईपर्यंत मजास मंडईत विभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त (BMC Commissioner) निर्णय घेतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. यामुळे जोगेश्‍वरीकरांसाठीचे स्वतंत्र मनपा कार्यालय सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनपा आयुक्त व संबंधित खात्याचे व इतर अधिकारी उपस्थित होते.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात एकुण ८ प्रभाग येत असून यातील ६ प्रभाग (७२, ७३, ७४, ७७, ७८ व ७९) हे के (पूर्व) व २ प्रभाग (५२ व ५३) हे पी (दक्षिण) कार्यालयास जोडण्यात आले आहे. ही दोन्ही मनपाची कार्यालये सुमारे ८ ते ९ कि.मी अंतरावर आहेत. मागील काही वर्षांमध्ये जोगेश्‍वरीचा सर्वांगिण विकास होत असल्याने येथील लोकसंख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे विविध कामांसाठी मनपाच्या या दोन्ही कार्यालयात जाण्या व येण्यासाठी येथील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र विभागीय मनपा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती.

सुरुवातील जोगेश्‍वरी (Jogeshwari) मौजे मजास न.भू.क्र ५० व ५१ या भूभागावर मनपा कार्यालय उभारण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु तांत्रिक व धोरणात्मक बाबींमुळे हा प्रस्ताव मंजुर होण्यास विलंब होत असल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मजास मंडई या इमारतीत जोगेश्‍वरीकरांसाठी स्वतंत्र मनपा कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावही पाठविला आहे.

सद्यस्थितीत पुनम नगर येथील मनपाच्या मजास मंडई या १० मजली इमारतीतील काही मजले मनपाच्या इमारत प्रस्ताव विभागास वापर करण्यास देण्यात आले आहेत. या इमारतीत वाहन पार्किंगची सुविधा असून इमारत जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना विविध कामांसाठी ये -जा करण्याठी सोयीस्कर आहे. या प्रश्‍नी २०१२ पासून या प्रकरणी मुंबई महानगरपालिका प्रशासन व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून कपात सुचना, प्रश्‍न अशा विविध आयुधांच्या माध्यमातून ही बाबा उपस्थित करण्यात आली आहे.

१० मजली मजास मंडईच्या इमारतीतील ३ मजले मंडईकरीता राखून ठेवून उर्वरित रिक्त मजले के (पूर्व) व पी (दक्षिण) कार्यालयांतर्गत येणार्‍या जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील ८ प्रभागांसाठी जोगेश्‍वरीकरांसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यास उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार रविंद्र वायकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, या मंडईतील गाळयांचे मनपाने जे करार केला आहेत, त्या करारामुळे काही अडचण निर्माण होणार नाही याचा विचार करावा. तसेच सध्या मनपाचे प्रशासक म्हणुन आयुक्त काम करीत असल्याने नागरीकांना हे नविन मनपा कार्यालय सोयीस्कर पडणार असल्याने आयुक्तांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे आश्‍वासन विधानसभेत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here