@maharashtracity
बँकेमार्फत पोलीस दलासह महानगर पालिकेला ७५ फलक प्रदान
धुळे: शहरातील वाहनधारकांसह नागरिकांमध्ये वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती व्हावी तसेच रहदारीस अडथळा होणार नाही असे वाहन पार्कींग (Vehicle parking) करण्याबाबत मार्गदर्शन व्हावे, याकरीता वाहन धारकांसाठी एका बँकेमार्फत शहर वाहतुक शाखा व धुळे महानगर पालिकेला ७५ माहिती दर्शक फलक देण्यात आले. त्या फलकांचे शुक्रवारी अनावरण झाले.
धुळे महानगर पालिका आणि शहर वाहतुक शाखा धुळे यांच्या माध्यमातून शहरातील संतोषीमाता चौक, कमलाबाई चोक, गरुड संकुल, झाशीराणी पुतळा चौक, महाराणा प्रताप चौक, गोल पोलीस चौकी, नेहरु चौक, दत्तमंदिर चौक, जुना आग्रा रोड, कराची चौक, शहर चौकी, पारोळारोड चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक, बारा पत्थर चौक, मामलेदार केचरी, टपाल कार्यालय चौक, जेलरोड परिसर, बस स्थानक, पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार, फाशीपुल चौक, स्टेशन रोड चौक, दसेरा मैदान चौक या भागात ठिकठिकाणी माहिती दर्शक फलक बसविण्यात येणार आहेत.
संतोषी माता चौकात शुक्रवारी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते माहिती दर्शक फलकांचे अनावरण झाले. या वेळी ए.यु.बँकेचे मॅनेजर अनुराग त्यागी, सहाय्यक मॅनेजर पंकज गाडेकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक निरीक्षक संगीता महाजन, उपनिरीक्षक रामदास जाधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.