@maharashtracity

भंडारा रुग्णालय दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना

रुग्णालयात आग लागल्यास नलिकाविरहित धूर शोधक व धूर बाहेर फेकणारी प्रणाली

जीवित-वित्तहानी टाळण्याचा प्रयत्न

मुंबई: भंडारा येथील रुग्णालयात काही कालावधीपूर्वी भीषण आग लागून मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने १६ सर्वसाधारण उपनगरीय रुग्णालयात आग लागल्यास आगीचा धूर गाळून बाहेर फेकणारी प्रणाली, अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही यंत्रणा रुग्णालयात प्रस्थापित करणे, तिची चाचणी घेणे व ती कार्यान्वित करून तिची देखभालदुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

भंडारा जिल्हा सामान्य विभाग रुग्णालयात ९ जानेवारी मध्यरात्रीच्या सुमारास नवजात बालकांच्या युनिटमध्ये अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या सर्वसाधारण उपनगरीय रुग्णालयात आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, भाईंदर, मिरा रोड, नवी मुंबई आदी भागातून रुग्ण येत असतात. पालिकेच्या १६ सर्वसाधारण उपनगरीय रुग्णालयात आयसीयू, नवजात बालकांचा विभाग, वैद्यकीय कक्ष, यांत्रिक, विद्युत विभाग आहेत. याठिकाणी २४ तास विद्युत यंत्रणा कार्यान्वित असते.

या विद्युत यंत्रणेत, प्रणालीत काही तांत्रिक बिघाड झाल्यास आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी आदींच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे अशा बिकट प्रसंगी रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर यांच्या नाकातोंडात आगीचा धूर जाऊन काही जीवित हानी होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे रुग्णालयात आग लागल्यास होणारी जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी आगीचा धूर गाळून बाहेर फेकणारी प्रणाली, अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

ही अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पालिकेने मेसर्स मॅक एंटरप्रायजेस या कंत्राटदाराला २ कोटी ४० लाख रुपयांचे कंत्राटकाम देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदार पुढील सहा महिन्यात यंत्रणा कार्यान्वित करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here