By Pranita Deshpande

@advpranita_a

नेदरलँड : बाहेरगावी – नेदरलँडला (Netherlands) राहणारी गौरी आणि भारतात (India) राहणारी प्राजक्ता या भौगलिकरीत्या एकमेकींपासून दूर राहत असल्या तरी एकमेकींच्या खास बालमैत्रीणी! प्राजक्ता कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असूनही ती स्वभावाने मात्र मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती. अर्थात यामुळेच गौरी आणि प्राजक्तामध्ये देशाविषयी, आजच्या पिढीविषयी, कामाविषयी वैचारिक मतभेद होते. तरी त्यांची मैत्री मात्र घट्ट होती. लांब राहूनही दोघी संपर्कात होत्या. कौर्य रूप घेतलेला हा कोरोना (corona) काळ दोघींनाही बेचैन करत होता. अशाच एका रणरणत्या दुपारी प्राजक्ताचा फोन वाजला, फोन गौरीचा होता.

गौरीकडे सकाळ झाली होती, रात्रभर कोरोना काळात देशाच्या परिस्थितीचा विचार करून अस्वस्थ झालेली गौरी बोलू लागली, ‘‘खूप आठवण येते गं आपल्या देशाची… आपल्या शहराची… आपल्या माणसांची! खरंच कोरोनाची सद्यःस्थिती रोज टीव्हीवर पाहून मन अगदी सुन्न होतं! असं वाटतं मी आज भारतात हवी होते. कुठल्यातरी संस्थेमार्फत का होईना मी नक्कीच स्वयंसेवक म्हणून मदतीसाठी हातभार लावला असता.’’

यावर थोड्या रागानेच प्राजक्ताने प्रत्युत्तर दिले, ‘‘तू वेडी आहेस का, अगं इथे भारतात लोक परदेशात जाण्यासाठी अक्षरशः धडपडत असतात. तुला तुझ्या नशिबानं परदेशात राहायला मिळतंय, किती भाग्यवान आहेस तू! तर तू काय सारखं इकडे यायचं म्हणत असतेस? कोरोना किती वाढला आहे इथं. सारखं लॅाकडाउन (lockdown) चालू असतं.’’

यावर शांतपणे उत्तर देत गौरी म्हणाली, ‘‘अगं, सगळ्याच देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. जगातील बहुतेक देशांनी लॉकडाउन घोषित केला आहे. ‘घरी रहा – सुरक्षित रहा’ असा संदेश आम्हालाही देण्यात आला आहे. पण मग अचानक माझ्या मनात एक गोंधळात टाकणारा प्रश्न आला की, आपल्यापैकी काही जणींसाठी घर ही सुरक्षित ठिकाण नसेल तर? समाजातील सर्वात असुरक्षित घटक स्त्रिया आणि मुले आहेत. त्यांना नेहमीच अत्याचाराचा सामना करावा लागतो. आणीबाणी, आर्थिक संकट आणि साथीच्या पार्श्वभूमीवर तर महिला आणि मुलांवरील हिंसाचारात तर तिप्पटीने वाढ होते.”

“जागतिक महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि महिला आणि मुलींवरील हिंसाचार रोखण्यासाठी काम करणाऱ्‍या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) शाखेने तर कोविड (covid) लॉकडाउनमधील वाढत्या घरगुती हिंसाचाराचा ‘छाया महामारी’ (Shadow pandemic) म्हणून निषेध केला आहे.

महिलांवरील हिंसाचार (violence against women) विनाशकारक तर असतोच आणि तो भयानक गुन्ह्यांना जन्म देण्यासही सुरवात करतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक तीन स्त्रियांपैकी एक स्त्री तिच्या जोडीदाराकडून किंवा इतर व्यक्तीकडून लैंगिक हिंसाचाराचा सामना करत असते.’’

परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज आल्यानंतर प्राजक्ता म्हणाली, ‘‘अगदी विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. ‘कोविड -१९’ च्या लसीद्वारे कोरोनावर काही प्रमाणात मात करता येईलही, पण महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी खरी ‘लस’ बाजारात आणायला हवी. यासाठी महिलांना रोजगाराची (employment) योग्य संधी, त्यांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. यासाठी सरकार, समुदाय आणि प्रत्येक व्यक्तीकडून एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच आपण ही लढाई लढू शकतो.’’

‘‘अगदी मनातलं बोललीस बघ प्राजक्ता. लॉकडाउनच्या काळात तर सगळ्या महत्त्वपूर्ण सेवांमध्ये व्यत्यय आल्यामुळे तर महिलांवरचा हिंसाचार वाढत आहे, अशी चेतावणी तर जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

ओशिनिया, दक्षिण आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये जोडीदाराच्या हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजेच ३३ ते ५१ टक्के आहे. तसेच सर्वात कमी दर युरोप (१६ ते २३ टक्के), मध्य आशिया (१८ टक्के), पूर्व आशिया (२० टक्के) आणि दक्षिण-पूर्व आशिया (२१ टक्के) मध्ये आहे. यामध्ये १५ ते २४ वयोगटातील तरुण स्त्रिया सर्वाधिक हिंसाचाराच्या बळी ठरतात. साथीच्या रोगादरम्यान जगभरात घरगुती हिंसाचार वाढतच आहेत.

लॉकडाउनच्या काळात मदतनीस, पोलिस आणि इतर सेवा प्रदात्यांद्वारे मदतीसाठी संपर्क साधू शकणाऱ्‍या महिलांच्या आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढला आहे. परंतु ज्या महिलांचे फोन यंत्रणेपर्यंत पोचत नाहीत त्यांची संख्याही मोठी आहे. फोन सुविधेचा अभाव, धैर्य नसणे, पकडले जाण्याची भीती, सामाजिक बंधन इत्यादी बरेच अडथळे त्यांना अहवाल देण्यास प्रतिबंध करतात.’

‘‘मान्य आहे गौरी, की समाजाच्या भीतीपोटी आजही आपल्या देशात स्त्रिया समोर येत नाहीत. त्यातच राष्ट्रीय महिला आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, लॉकडाऊन दरम्यान आलेल्या तक्रारींची संख्या सामान्य कालावधीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. बिहार (Bihar), उत्तर प्रदेश (UP), हरियाना (Haryana), पंजाब (Punjab), दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) घरगुती हिंसाचाराचे प्रकार अधिक प्रमाणात आढळतात.

‘नॅशनल कमिशन फॉर वुमन’ने (NCW) तर एक खास व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे: +९१ ७२१७७३५३७२, जो लॉकडाऊन कालावधी दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींसाठी खास हेल्पलाइन म्हणून काम करेल. हे ई-मेल, ऑनलाइन तक्रारी आणि हेल्पलाइन नंबर या व्यतिरिक्त ही सोय आहे. काय गं गौरी, भारताप्रमाणे, इतर देशांमध्येसुद्धा महिला घरगुती अत्याचाराविरोधात माहामारीत काही खास जागतिक उपाय केले आहेत का?’’

‘‘अर्थातच जगातला असा कुठला कोपरा नसेल जिथे, स्त्रीला अत्याचार सहन करावे लागत नसतील. त्याचे प्रमाण कमी जास्त असू शकते. नेदरलँड्सबद्दल सांगायचे झाले तर, सरकारची कोरोना मोहिमे अंतर्गतच घरगुती अत्याचार रोखण्यासाठीचे उपाय आणि पीडितांसाठी संरक्षण यांचा समावेश आहे.

त्वरित धोका असेल तर ११२ वर कॉल करून पोलिसांना मदतीसाठी विचारूही शकतात. तसेच ‘वेलिग थुईस’ (घरी सुरक्षित) नावाची सेवा देखील आहे, जी कोणत्याही घरगुती हिंसाचाराबद्दल किंवा मुलांवर होणाऱ्‍या अत्याचारासाठी सल्ला आणि रिपोर्टिंग पॉइंट आहे.

तसेच हेल्पलाइनवर पीडित स्री कधीही कॉल करू शकते. ही सेवा महिलांसाठी आश्रयस्थाने देखील चालवते. फ्रेंच सरकारने लॉकडाऊनच्या दरम्यान घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना फार्मसीमध्ये घरगुती अत्याचाराचा अहवाल देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी वस्तू खरेदीसाठी आलेल्या महिलांना मदत करण्यासाठी दुकानात समुपदेशन केंद्र (Counselling Center) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पेनमध्येही (Spain) अशीच एक पद्धत आहे, जिथे महिला त्यांच्या फार्मसीमध्ये जाऊन ‘मास्क १९’ ची विनंती करू शकतात – हा एक कोड शब्द आहे जो फार्मासिस्टला अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सतर्क करतो. अमेरिकेत (USA) घरगुती हिंसाचाराने बळी पडलेल्या एखाद्या महिलेला ९९९ वर कॉल केला आणि ५५ नंबर डायल केल्यास पोलिसांना मूक कॉल (silent call) जातो व महिलेला मदत मिळते.’’

‘‘खरंच गौरी आज खूप नवी माहिती मिळाली आणि प्रत्येक देश या माहामारीच्या काळात महिला हिंसाचाराच्या विरोधात लढण्यास तयार आहे, हे पाहून समाधान वाटलं.’’

हे सगळे पाहता आल्फ्रेड हिचकॅाक यांच्या ‘बर्ड्स’ या चित्रपटाची आठवण झाली. कॅलिफोर्नियामधील बोडेगा खाडीच्या लोकांवर अचानक एक दिवस हिंसक पक्षी हल्ला करतात, यावर हा चित्रपट आधारीत आहे. हिचकॉक यांनी एका मुलाखतीत असेही म्हटले आहे, की निसर्गाला नकार दिल्याबद्दल त्यांना शिक्षा देण्यासाठी या चित्रपटातील पक्षी मानवाविरूद्ध उठतात. तसेच या चित्रपटात अशाच चिंता आणि भयानक अनुभव दाखविले आहेत.

पक्ष्यांच्या हल्ल्यांनंतर बोडेगा बेटावर संपूर्ण लॉकडाउन करण्यात येतो. सर्वत्र दहशतीचे वातावरण होते. रस्ते, कार्यालये आणि रेडिओ स्टेशन सर्व निर्जन होते. सर्व काही जाम होते. आता पुढे काय होईल? प्रत्येकजण काळजीत पडला होता. तथापि, आजही चिंता, भीती आणि लॉकडाउन यात समानता आहेत. सर्व परिस्थिती सारखीच आहे. पण यावेळी पक्षी नाही; तर प्राणघातक विषाणू जगभर पसरला आहे. पण घराच्या चार भिंतीच्या आत असलेल्या या हिंसक मानवी देहात असलेल्या राक्षसी प्रवृत्तीच काय?? पुन्हा हाच प्रश्न पडतो.

सौ.प्रणिता अ.देशपांडे
द हेग,नेदरलॅंडस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here