@maharashtracity
By विजय साखळकर
वर्धाभाईचं मूळ नाव वर्धराजन मुदलियार (Varadarajan Mudaliar). हाजी मस्तान (Haji Mastan), करीमलाला (Karim Lala) यांच्यासारखाच सिनेमाचा विषय ठरलेला हा अंडरवर्ल्डचा अनवाॅटेड हिरो (Underworld Hero) तामिळनाडूतून (Tamil Nadu) मुंबईत (Mumbai) दाखल झाला.
बाकीच्या गोष्टींबरोबरच मुंबईकर त्याला त्यानं सुरू केलेल्या सार्वजनिक गणपतीवरून (Ganesh Festival) ओळखायचे. त्याच्या या गणपतीचा खाक्याच वेगळा. तो गणपती बसायचा गणेश चतुर्थीच्या दिवशी पण त्याचं विसर्जन व्हायचं ते अनंत चतुर्दशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी…. मुंबईकरांना हे माहीत होतं आणि त्या दिवशी माटुंगा (Maunga) पश्चिम ते दादरपर्यंत (Dadar) लोक वर्धाभाईच्या गणपतीला निरोप देण्यासाठी प्रतीक्षा करीत असत.
वर्धाच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट फिरोज खाननं (Feroz Khan) काढला होता. विनोद खन्ना (Vinod Khanna) यानं वर्धाची भूमिका निभावली होती तर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) त्याची प्रेयसी झाली होती. फिरोज खाननं त्याचा विश्वासू साथीदार म्हणून भूमिका निभावली होती. जाणकारांच्या मते ते पात्र वर्धराजन याचा विश्वासू साथीदार सोमशेखर उर्फ सोमा यांच्यावरून बेतलं असावं.
यातील वर्धाभाई हा मात्र वर्धराजन मुदलियार याच्यासारखा गरिबांचा कनवाळू होता आणि आपल्या सर्व बेकायदा कामांसाठी या गरीबांचाच वापर करायचा. त्याची मुलगी त्या सिनेमातल्यासारखी काॅलेजात जात नव्हती. मुलगाही अंतिम क्षणी कोर्टाच्या आवारात गाडी घेऊन घुसला नव्हता. त्याचा जावई सिनेमातल्या जावयासारखा तत्त्ववादी आणि सासऱ्याच्या अटकेसाठी उतावीळ झालेला पोलीस निरीक्षक (Police Inspector) नव्हता. हाच सिनेमातला आणि प्रत्यक्ष जीवनातला फरक.
वर्धराजन मुदलियार मुंबईत आल्यावर काय करीत होता याविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. मुंबईत आल्यावर वर्धा एका समाजसेवकाच्या गोतावळ्यात दाखल झाला व त्याच्या गोतावळ्यात असतानाच त्यानं आपली ताकद तयार केली, माणसं फीतवली आणि स्वत:ची टोळी निर्माण केली असं वर्धाचे निधन झाल्यांनंतर एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केलं होतं.
पोलीस फायलींमध्ये वर्धराजनचं कार्य कोरलं जात असतानाच एका मराठी वर्तमानपत्रात मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात धारावीतील (Dharavi Slum) वाढत्या झोपड्यांतील रहिवासींना अमानवी जीवन जगावे लागते आहे व भराव टाकून झोपडीत पाणी न शिरण्याची काळजी समाजसेवक वर्धराजन नायर यांनी घेतली असा उल्लेख होता. त्याहीवेळी लोक वर्धाभाई कोण असा विचार करीत असावेत.
वर्धराजन आणि पोलीस अधिकारी यादवराव यांचं एक वेगळं नातं होतं आणि यादवराव पवारांनीच (YC Pawar) वर्धाच्या विरोधात आघाडी उघडून त्याला निष्प्रभ करीत आणले होते. त्यांना या कामात वादग्रस्त महापालिका उपायुक्त गो.रा. खैरनार (G R Khairnar) यांंनी सहाय्य केले.
शेवटचा उपाय म्हणून यादवराव पवार यांना निष्प्रभ करण्यासाठी वर्धाभाईनं दोन पोलीस अधिका-यांशी सुरू असलेल्या बातचितीच्या कॅसेटस् सर्व वर्तमानपत्रांना आणि महत्त्वाच्या नियतकालिकांना पाठवल्या होत्या. पण त्याच काळात बब्बू नामक व्यक्तीच्या पंचतारांकित पार्टीत नाचकाम करणा-या पोलीस अधिकाऱ्याच्या शाॅटसपुढे ती कॅसेट निष्प्रभ ठरली. ती माहिती आधी बाहेर आलेली असूनही वर्धाभाई चा प्लॅन अयशस्वी झाला.
याच वर्धाभाईला राजकीय वरदहस्त लाभलेला असल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. असंही म्हटलं गेलं की राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी धारावीत सभा घेण्याचं ठरलं होते. त्यावेळी धारावीत अत्तर शिंपडून सुगंध पसरविण्याचा मक्ता वर्धांनं घेतला होता.
वर्धराज मुदलियार आणि बडा राजन (Bada Rajan) यांची परस्परांशी मैत्री होती असं म्हणतात. आधी कट्टर दुष्मनी होती. पण शत्रुत्त्व मैत्रीत बदलणं ही वर्धराज मुदलियार यांची खासियत होती.
अमर नाईकवरही (Amar Naik) वर्धाचा जीव होता. वर्धा १९७५ मध्ये आणीबाणी (Emergency) काळात तुरुंगात होता. तिथं बरेच तस्कर होते. त्यांचा रुबाब पाहून वर्धा तस्करीत शिरला.
(लेखक विजय साखळकर ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)