@maharashtracity

राणीच्या रत्नहाराचे पर्यटकांना होणार विहंगम दर्शन

‘स्वराज्यभूमी’ लगत ३ महिन्यात उभारणार ‘दर्शक गॅलरी’

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई: मुंबईतील माहिम चौपटी पाठोपाठ आता गिरगाव चौपाटीसुद्धा (Girgaon Chowpatty) कात टाकणार आहे. गिरगाव चौपाटी येथील ‘स्वराज्यभूमी’ लगत येत्या ३ महिन्यात आकर्षक अशी ‘दर्शक गॅलरी’ (Visitors Gallery) उभारण्यात येणार आहे. या गॅलरीमधून राणीचा रत्नहार असलेल्या ‘मरिन ड्राइव्ह’ (Marine Drive) परिसराचे विहंगम दर्शन पर्यटकांना घडणार आहे.

या गिरगाव चौपाटीच्या सुशोभीकरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील पर्यटन स्थळांच्या संख्येत आणखीन एका पर्यटन स्थळाची (Tourist Spot) भर पडणार आहे.

गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राईव्हचे वैशिष्ट्यपूर्ण व मनमोहक दर्शन घडविणा-या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि पालक मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray) यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

याप्रसंगी, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अशी असेल ‘दर्शक गॅलरी’

गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीच्या वर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे तसेच ‘राणीचा रत्नहार’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय व मनमोहक दर्शन घडविणा-या गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यापूर्वी भरती – ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. तसेच, सदर गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here