@maharashtracity

पवई तलावांतील क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी वापरत नाही

मुंबई: मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तुळशी (Tulsi lake) व विहार (Vihar lake) या दोन तलावांच्या आणि क्षारयुक्त पाणी असलेल्या (पिण्यायोग्य नसलेल्या) पवई तलाव (Powai lake) अशा एकूण तीन तलावांच्या देखभाल, दुरुस्ती कामांसह मजबुतीकरणासाठी मुंबई महापालिका (BMC) १.१५ कोटी रुपये खर्चाचा सल्लागार (Consultant) नेमणार आहे.  

वास्तविक, तुळशी व विहार हे तलाव अगदी कमी पाणी साठवण क्षमता असलेले तलाव असून त्यांची देखभाल, दुरुस्ती व मजबुतीकरण करणे समजण्यासारखे आहे. मात्र ज्या पवई तलावांतील क्षारयुक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात नाही त्या तलावाच्या देखभाल, दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम या दोन तलावांसोबत घेण्यात येणार आहे.    

पवई व विहार तलाव ओव्हरफ्लो झाला की त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. जर त्याच वेळी अतिवृष्टी होत असेल आणि समुद्रालाही मोठी भरती असेल तर मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडते व त्यामुळे मोटजी नदी परिसरातील क्रांतीनगर आदी भागात पूरस्थिती निर्माण होते.    

मुंबई महापालिका, ही बाब ओळखून हे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचाही विचार करीत आहे. काही दिवसांपूर्वीच भांडुप संकुलात जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून यंत्रणा ठप्प झाल्याने मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. 

नॅशनल पार्क भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी विहार तलावांत वळविण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे एकूणच विहार, तुळशी व पवई या तीन तलावांच्या मजबुतीकरणाचे काम पालिकेतर्फे लवकरच हाती घेण्यात येणार आहे. 

धरण सुरक्षा संघटना, नाशिक यांनी सुचविल्याप्रमाणे विहार, तुळशी व पवई या तीन तलावांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक या संस्थेला सल्लागार सेवा पुरविण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेला १.१५ कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत.

या सल्लागाराने सुचविल्याप्रमाणे केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था, पुणे यांच्याकडून विहार, तुळशी व पवई तलावाच्या ‘ नॉनडिस्ट्रक्टीव्ह’ टेस्ट करण्यात आल्या आहेत.     

या टेस्टचा अहवाल हा मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना , नाशिक यांच्या कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे. सल्लागार सेवेचा कालावधी १८ महिने असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here