@maharashtracity
प्राध्यापकांचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
मुंबई: राज्यातील सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या उपोषणाने (protest of medical teachers) गुरुवारी तीव्र स्वरूप धारण केले होते. वैद्यकीय शिक्षण सचिव यांना वेळ घेऊन भेटण्यासाठी गेले असता वैद्यकीय शिक्षकांना अपमानास्पद वागणुक दिल्यामुळे आंदोलक प्राध्यापकांची सचिवांसोबत वाद झाला असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आक्रमक झालेल्या प्राध्यापकांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिले. मात्र गेले दोन वर्षे हा प्रस्ताव लाल फितीत फसला आहे. वेळोवेळी कॅबिनेट मंत्र्यांना निवेदन देवूनही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून निर्णय होत नसल्याने आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी सांगितले.
या निर्णयामुळे कोणताही आर्थिक भार पडणार नसताना देखील निर्णय होत नसल्याने जेजे रूग्णालयात (JJ Hospital) अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे साखळी उपोषण सुरू आहे. गुरुवारी या आंदोलनाचा १९ वा दिवस होता. कोरोना काळात याच कोरोना योद्ध्यांनी (corona warrior) जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिली. तरीही त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ का यावी? राज्याचे मुख्यमंत्री यांनादेखील निवेदन दिले आहे. या रास्त मागणीसाठी संवेदनशील मुख्यमंत्री नक्कीच निर्णय घेतील, अशी आशा वैद्यकीय शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली.