पवई मुलुंड मध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमान नोंद

@maharashtracity

मुंबई: मुंबईसह कोकण किनारपट्टीला (Coastal Konkan) आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा (heat wave) तडाखा बसणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शाळेकडून देण्यात आला आहे.

मंगळवार दिनांक १५ तसेच १६ मार्च रोजी कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य भारताकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तसेच समुद्राकडून येणारे थंड वारे उशिराने वाहत असल्याने कोकण किनारपट्टीवर उष्ण लाट आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी दोन दिवस उष्ण लाटेच्या राहणार असल्याचे मुंबई वेध शाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी मुंबई कुलाबा येथील कमाल तापमान ३९.४ तर सांताक्रूझ ३९.६ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. शनिवारी हेच तापमान ३८ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. मात्र हा रेकॉर्ड तोडून आजचा मुंबईतील ३९ डिग्री सेल्सिअस हे कमाल तापमान या मोसमातील उच्चांकी असल्याची नोंद करण्यात आली.

तर उपनगरातील पवई आणि मुलुंडने ४ वर्षांचा रॅकोर्ड तोडला. मुंबई व नजीकच्या बहुतांश भागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. संपूर्ण मुंबई व महानगर परिसराच्या तुलनेत मुलुंड आणि पवईत कमाल तापमान ४१.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हा रॅकोर्ड गेल्या ४ वर्षांतील मुंबईतील मार्च महिन्यातील कमाल तापमानातील सर्वात जास्त नोंदीचा ठरले.

याआधी २६ मार्च रोजी २०१८ रोजी ४१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते. तर मुंबई आजूबाजूच्या जिल्ह्यातील डहाणू ३४.८ तर ठाणे ३७.८ एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य भारतातून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्याने समुद्रावरून वाहणारे वाऱ्याला विलंब होत आहे. शिवाय आकाश निरभ्र आहे.

हवामानाची हि स्थिती लक्षात घेऊन कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्याना रायगड , ठाणे, मुंबई रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील तीन दिवसांसाठी १४, १५ आणि १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उन्हात जाणे टाळावे, सैल सुती कपडे वापरावे आणि भरपूर पाणी प्यावे, असे सूचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here