@maharashtracity

…तरी सात दिवसांचे क्वारंटाईन

मुंबई: ओमिक्रॉनची राज्यात एंट्री झाली असल्याचे समोर आल्यापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) असलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC) सावध झाली आहे. ओमिक्रॉन (Omicron) प्रभावित देशातून आलेल्या प्रवाशांवर मुंबई महानगरपालिकेची वॉच असून आलेल्या रुग्णांचा कोविड अहवाल (covid report) निगेटिव्ह आला तरी देखील त्याला सात दिवस क्वारंटाईनमध्ये (quarantine) ठेवून निरीक्षण करण्यात येणार आहे.

यातून प्रभावित देशातून आलेल्या प्रवाशांना नियमांचे उल्लंघन करण्यास संधीच ठेवली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ओमिक्रॉन संसर्ग पसरलेल्या देशांचे प्रभावित आणि अति प्रभावित अशी विभागणी करण्यात आली आहे. या दोन्ही विभागणीतील प्रवाशांची माहिती दररोज सकाळी ९ वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकारण प्रशासन पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवणार आहे.

तसेच तर मागील १५ दिवसातील प्रवाशांची यादी देखील पाठविली जाणार आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रोज १० वाजता प्रत्येक प्रभागातील प्रवाशांच्या नावासह वॉर्ड रुमला आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविण्यात येणार आहे.

यात प्रवाशाची इत्थभूत माहिती राहणार असून त्यात प्रवाशाचा पत्ता, संपर्क क्रमांक असे देण्यात येत आहे. शिवाय ही व्यक्ति राहत असलेल्या सोसायटीतील जबाबदार व्यक्तीलाही देण्यात येणार आहे. शिवाय ही व्यक्ति होम क्वारंटाईनचे नियम पाळते की नाही यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

या व्यक्तिंना कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. तर वॉर्ड रुम अखत्यारित दहा रुग्णवाहिका (Ambulance) सज्ज ठेवण्यात येणार आहेत. सध्या तीन रुग्ण वाहिका आहेत. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशाला पालिकेच्या क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात येणार असून सातव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीसीआर (RTPCR test) चाचणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here