@maharashtracity

महापौरांचा चित्रा वाघ यांना टोला

महापौर – चित्रा वाघ शीतयुद्ध सुरूच

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) तुम्ही काय दिवे लावले ते दुनियेला माहीत आहे. बाडगे आता बांग देत आहेत. तुम्ही बाहेरून भाजपात (BJP) गेला आहात. तुम्ही तुमच्या पक्षाचा अजेंडा जरूर राबवा. मी मुंबईची महापौर आहे. मी काय करावे व काय करू नये हे मला चांगले कळते. ते तुम्ही मला शिकवू नये. तुमची भाईगिरी व ताईगिरी तुमच्याकडेच ठेवा, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना लगावला आहे.

घाटकोपर ( प.), जगदूशा नगर येथे उभारण्यात आलेल्या ‘वाॅटर रिसायकलींग कम्युनिटी टाॅयलेट’चे लोकार्पण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रसिध्दमाध्यमांशी बोलताना महापौरांनी भाजपच्या चित्रा वाघ यांना टोला लगावला.

बोरिवली येथे भाजप कार्यालयात एका महिलेबाबत झालेली विनयभंगाची घटना (woman assaulted at Birovli BJP office), डोंबिवली (Dombivli) येथे लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण या घटनाप्रकरणावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शीतयुद्ध अद्याप संपलेले नाही. दोन्हीकडून एकमेकांना म्हणजे अरेला कारे करीत उत्तर प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे हे शीतयुद्ध संपता संपत नाही.

“मी मुंबईची महापौर आहे. मुंबईत कुठेही चांगली, वाईट घटना घडली तर मी त्या ठिकाणी आवर्जून भेट देते, माहिती घेते आणि आवश्यक कार्यवाही करते. आता खार येथील आगीच्या ठिकाणी मी भेट दिली होती. मात्र मी काय करावे व काय करू नये, हे मला बाहेरून आलेल्या बाडग्यांनी शिकवू नये,” या शब्दांत महापौर पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना झापले आहे.

“एखाद्या ठिकाणी जाऊन उगाच खोटे खोटे रडून दाखवायचे, स्टंटबाजी, ढोंगबाजी करायची ही कामे तेच करू शकतात. आम्ही मात्र प्रत्यक्ष कामे करतो, असली नाटकबाजी करीत नाही. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून नव्हे अगदी दरवाजा तोडून, असली कामे आम्हाला जमत नाहीत,” अशा शब्दात महापौरांनी चित्रा वाघ यांना फटकारले आहे.

संजय राठोड प्रकरणात सरकारने योग्य ती कार्यवाही केली आहे. उगाचच शिवसेनेवर तोंडसुख घेऊ नये, असेही महापौरांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here