@maharashtracity

धुळे: किराणा दुकानांसह मोठ्या पंचतारांकीत मॉल्समध्ये सर्रासपणे वाईन विक्रीसाठी (wine in super market) सरकारने दिलेली परवानगी म्हणजे मुख्यमंत्र्यांची दादागिरी आहे. या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्र दारुबंदी महिला मोर्चातर्फे तीव्र निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने (protest against wine sale in super market) करण्यात आली. हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा सरकारविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत दारुबंदी महिला मोर्चाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्यानुसार सरकारने किराणा दुकान, मॉलवर खुलेआम दारू विक्रीला परवानगी दिली आहे. या दादागिरीच्या निर्णयाचा आम्ही सर्व महिला धिक्कार करतो. या निर्णयामुळे महिलांच्या मनातून पालनहार, हितचिंतक मुख्यमंत्री म्हणून आपण अधिकार गमावला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील तरूण पिढीचे आयुष्य व्यसनाधिनतेत जाणार आहे. सुलभतेने मिळणार्‍या दारूमुळे घराघरात मद्यपी तयार होतील. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. महिलांच्या छेडखानीचे प्रकार वाढतील. अत्यंत चुकीचा निर्णय घेतल्यामुळे राज्याची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे हा विध्वंसकारी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे.

या आंदोलनात अध्यक्षा गितांजली कोळी, अलका कापुरे, चेतना उपाध्याय, शोभा ठाकरे, विमल सोनवणे, प्रकाश पाटील, सुवर्णा बोरसे, हिरालाल कोळी, मनोहर कोळी, जिगर कोळी, सोनिया कुमावत, अमोल नवसारे, रविंद्र कोळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here