@maharashtracity

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती

धुळे: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), सदस्या उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवार 9 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे (Maharashtra State Women’s Commission) कार्यालय मुंबई येथे आहे. राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारींबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाद्वारे धुळे येथे जनसुनावणी होईल.

तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तत्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. या सुनावणीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलिस विभाग, समुपदेशन केंद्राकडून तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.

या सुनावणीसाठी पॅनेल तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर, जिल्हाधिकारी किंवा कार्यालयीन प्रतिनिधी, विधी सेवा प्राधिकरणाचे विधीतज्ञ, पोलिस विभागाचे वरीष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, संरक्षण अधिकारी, महिला व मुलांच्या सहाय्य कक्षाचे समुपदेशक, जिल्हा समन्वयक यांचा समावेश असणार आहे.

कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंदे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here