@maharashtracity
पतीसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल, दोघे ताब्यात
धुळे: पत्नीशी अनैतिक संबधाच्या संशयावरुन पतीसह तिघांनी एका युवकाचा लाकडी दांड्याने मारहाण करुन खून केला. शहरातील मिल परिसरातील रासकर नगरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तिघांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला असून यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मयूर मच्छिंद्र शार्दुल (वय 32, रा.रासकर नगर धुळे) व निखील साहेबराव पाटील (वय 22, रा.सुरतवाला बिल्डींगजवळ, धुळे) हे दोघे मित्र होेते. निखीलचे नेहमीच मयूरच्या घरी येणे जाणे होते. यातून निखीलचे व मयूरच्या पत्नीचे अनैतिक संबंध जुळले. ही माहीती मयूरला समजली. त्यामुळे त्याने निखीलचा काटा काढण्याचे ठरविले. परंतू, याची कानोकानी खबर लागल्याने 27 जानेवारीपासून निखील घरातून निघून गेला.
त्यादिवसापासून मयूर व त्याचे भाऊ मनोज, मुकेश हे निखीलचा शोध घेत होते. निखील शिरपूर तालुक्यातील शिगावे येथे मावस भाऊ किरण मनोहर पाटील याच्या घरी लपून बसल्याची माहीती मयूरला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी मयूर व त्याच्या मित्रांनी निखीलला शिगावे येथून अपहरण करुन धुळ्याला आणले.
शहरातील स्वराज्य नगरातील मावशीच्या घरात निखीलला कोंबून मयूर, मनोज, मुकेश यांनी त्याला लाकडी दांड्याने व हाताबुक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत निखीलचा जागीच मृत्यू झाला. तसेच यावेळी निखीलचा भाऊ दीपक साहेबराव पाटील रा.रासकर नगर, धुळे यालाही मारहाण करुन जखमी करण्यात आले.
या घटनेची माहीती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह हवालदरार गुणवंत पाटील, दिनेश परदेशी, मुक्तार मंसूरी, सतीष कोठावदे, राहूल सोनवणे यांनी धाव घेत मयूर, मुकेश यांना ताब्यात घेतले. तसेच निखीलचा मृतदेह हिरे रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
या प्रकरणी दीपक साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मयूर, मनोज, मुकेश शार्दुल यांच्याविरुध्द भादंवि 302, 326, 364, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.