@maharashtracity

युवासेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

धुळे: कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता शाळांमध्येच आधार अपडेटची सुविधा (Aadhar update facility) करावी, अशी मागणी युवासेनेने (Yuva Sena) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.

आधार अपडेटसाठी गरज पडल्यास युवासेनेचे कार्यकर्ते जिल्हा प्रशासनाला मदत करतील, असेही युवासेनेने म्हटले आहे.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदात युवासेनेने म्हटले आहे की, सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगल्या प्रकारे दिसून येत आहे. केंद्रातर्फे आधार अपडेट कार्यक्रम सुरू आहे. धुळे (Dhule) शहरात केवळ पाच ठिकाणीच हे केंद्र सुरू आहेत. प्रत्येक केंद्रावर आधार अपडेटसाठी काही मोजकीच संख्या दिल्याने अनेक पालकांना आधार अपडेटसाठी दोन ते तीन दिवस केंद्रावर फेर्‍या माराव्या लागत आहे.

आता कुठे विद्यार्थी शाळेत येऊ लागले आणि त्यात आणखी आधार कार्ड अपडेटची सक्ती सुरु आहे. आधार कार्ड अपडेट असेल तर वर्गात बसण्याची परवानगी दिली जात आहे. यामुळे काही पालकांनी या संदर्भात शिवसेना (Shiv Sena) कार्यालय भगवा चौक येथे तक्रारी केल्यात.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेतच आधार अपडेट कार्यक्रम राबवावे. यातून पालकांचा वेळ वाचेल, त्यांना त्रासही होणार नाही, आणि विद्यार्थ्यांचे आधार अपडेट शाळेत होतील. पुढील काही दिवसात प्रत्येक शाळेत शासनाच्या महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून दोन दिवसीय आधार अपडेट कार्यक्रम राबवावे. यासाठी युवासेनेचे कार्यकर्तेही मदतीस तयार आहेत.

आपण सर्वच शाळाना सूचित करावे की आधार अपडेट नसेल तरीही विद्यार्थ्यांना वर्गात बसू द्यावे. जेणेकरून विद्यार्थी शाळेत जाण्याला घाबरणार नाही. यासाठी आपण प्रत्येक शाळेत आधार अपडेट कार्यक्रम राबवावा, अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख संदीप मुळीक, शहर प्रमुख अमित खंडेलवाल, देवपूर शहर प्रमुख जितेंद्र पाटील, उपशहर प्रमुख आकाश शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here