@maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी एकही कोरोना बाधित रुग्णाचा (corona patients) मृत्यु झाला नसल्याची नोंद करण्यात आली. राज्यात शून्य मृत्यू नोंद करण्याची या आठवडाभरातील ही तिसरी वेळ आहे.

दिनांक ३ मार्च, ७ मार्च व ९ मार्च २०२२ या दिवशी राज्यात शून्य मृत्यू नोंद करण्यात आली. तीन महिन्यापूर्वी ओमीक्रोनची लाट (omicron wave) आल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात वाढते लसीकरण (vaccination) व जनजागृतीमुळे रुग्णसंख्या घटत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

तसेच राज्यात बुधवारी ३५९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६९,८५७ झाली आहे. बुधवारी ५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१९,१०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ३,००९ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८३,१९,१०० प्रयोगशाळा नमुन्यापैकी ७८,६९,८५७ (१०.०४ टक्के) नमुने पॉझीटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,११६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बुधवारी मुंबईत ५४ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५४ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५६१४९ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९२ एवढी झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here