X : MasoleSantosh
धुळे: कापूस आणि तूर या पिकांत बेमालूमपणे गांजाची लागवड केल्याप्रकरणी चार संशयितांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे. शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान व रोहिणी गावादरम्यान आज सकाळी झालेल्या या कारवाईत लाखो रुपये किमतीचे गांजाचे पिक जप्त करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपला मोर्चा आज सकाळी अचानक शिरपूर तालुक्यातील गांजा शेतीकडे वळवीला. आवश्यक कुमक आणि संशयितांना सोबत घेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याने शिरपूर तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सुरज कालूसिंग पावरा, रोहित सुभाराम पवारा, समीर बळीराम पावरा व रसलाल हजारा पावरा सर्व रा. रोहिणी (ता. शिरपूर) यांना अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी वन जमिनीवर गांजाची बेमालुमपणे लागवड केली जाते. कापूस आणि तूर या पिकांच्या आत आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या गांजा पिकाबाबत अनेकदा ओरड होऊनही पुन्हा पुन्हा हा प्रकार घडत असल्याची माहिती पोलीस अधीकक्षक धिवरे यांना मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अशिक्षक धिवरे यांनी अधिकची माहिती मिळवून आधी संशयितांना ताब्यात घेतले आणि नंतर अचानक छापा घालण्याचा बेत आखला. आज सकाळी अधीक्षक धिवरे यांनी आपल्या अधीपत्याखालील पथकासह लकड्या हनुमान आणि रोहिणी गावा दरम्यान धडक दिली. यामुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली.
या ठिकाणी केलेल्या पाहणीत मोठ्या क्षेत्रावर तूर आणि कापूस पिकाची लागवड झालेली दिसली. या पिकांत बेमालुमपणे गांजाची लागवड झालेली असल्याचे यावेळी उघड झाले. आजवर अनेकदा अशी कारवाई झाली असली तरी प्रत्यक्ष आरोपी निष्पन्न होत नसल्याचे अनुभव आहेत. यावेळी मात्र पोलीस अधीक्षक धिवरे यांनी आधी संशयितांना ताब्यात घेतले आणि नंतर प्रत्यक्ष गांजाच्या शेतीवर छापा घातला. यामुळे धिवरे यांनी केलेल्या कारवाईचे वेगळेपण सिद्ध झाले आहे.
या शेतीच्या नेमक्या किती क्षेत्रावर गांजा पिकाची लागवड झाली आहे आणि गांजाच्या पिकाची नेमकी किंमत काय याची माहिती संकलित करण्याचे काम लागलीच हाती घेण्यात आले आहे. यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येतो आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने विविध कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून ही कारवाई अधिक जोमाने सुरु करण्यात आली आहे. शहर आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे चालणार्या धंद्यांवर छापा घालण्यात येत आहे.
पोलीस अधिक्षक धिवरे यांनी अशा संवेदनशील भागात प्रत्यक्ष भेटी देऊन गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न चालविल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होते आहे. धिवरे यांच्या अधीपत्याखालील अन्य अधिकारीही आता अशा कारवायांसाठी पुढे सरसावले आहेत.
“जिल्ह्यात कुठेही असे बेकायदेशीर कृत्य केले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. गुन्हेगारांवर कठोर कायद्याचा बडगा उगारण्यात येईल. गांजा सदृश्य उग्र गंध असलेल्या पिकाची या ठिकाणी लागवड झाल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अन्य भागातही असे संशयस्पद काही आढळल्यास कठोर कारवाई करू.
श्रीकांत धिवरे
जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे.