प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दवाखान्यांची एकूण संख्या झाली १०६
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजेच एचबीटी क्लिनिकच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर किमान १०० ’आपला दवाखाना‘ सुरु होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. आपला दवाखान्यांची एकूण संख्या १०६ इतकी झाली आहे, अशी घोषणा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली.
शिवसेनाप्रमुख (दिवंगत) बाळासाहेब ठाकरे यांच्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरुवातीला ५२ दवाखाने सुरु करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांच्या हस्ते आणखी २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तर बुधवारी २५ जानेवारी रोजी आणखी ३४ नवीन दवाखान्यांची यात भर पडली आहे.
आपला दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत २ लाख ५९ हजार २३४ मुंबईकरांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी या दवाखान्यांमधून २ लाख ४७ हजार ५७४ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सुविधेचा लाभ घेतला आहे. तर पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे ११ हजार ६६० रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे.
आपला दवाखान्यात सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सेवेत मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच एक्स-रे, सोनोग्राफी सारख्या चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे पालिकेच्या दरात वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत. शिवाय यात विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.