By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून नुकतेच या संस्थेने १६६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्वाचा उपक्रम असून यंदा प्रदर्शन दि. १५ मार्च ते दि. २१ मार्च 2023 सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत कलारसिकासाठी खुले राहील. सर्वानी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १४ मार्च २०२३ रोजी ५ वाजता आयोजित केला आहे. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार दिलीप रानडे, उदय घरत – माजी प्राध्यापक, सर. ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई आणि श्रीमती अरुणा गर्गे- प्रख्यात शिल्पकार यांची उपस्थिती लाभणार आहे.

भारतातील दृष्य कलेच्या क्षेत्रात सर जे.जे स्कूल ऑफ आर्टचे खूप मोठे योगदान आहे. या संस्थेत पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीचे चित्रकला  शिल्पकला, मातकाम, धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्र संकल्प व कला शिक्षक प्रशिक्षण हे अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये  मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या ग्रामीण व दुर्गम भागातून तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागातून शिक्षण घेण्यासाठी आलेले ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

वार्षिक कला प्रदर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्टच कलाकृती प्रदर्शित केल्या जातात व त्या मधून उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण वर्गकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. या प्रदर्शनात प्रदर्शित केलेल्या चित्र, शिल्प व वस्तू पाहून अनेक कलादालने अथवा व्यावसायिक कंपन्याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. त्या साठी या प्रदर्शनाचे महत्व वेगळे आहे.

या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली  व्यक्तिचित्र निसर्ग चित्र,  स्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत. त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व  रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित  विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत.

शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबर, लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे  दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत.

धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी ज्वेलरी, विविध वस्तू तसेच रिलीफ शिल्प तांब्याचा पत्रा, विविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून त्यांच्या कलाकृती तयार केल्या आहेत. त्याच बरोबर मातकामच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची भांडी व शिल्प तयार केली आहेत.

इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर, व इंटेरियरची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल तयार केली आहेत. टेक्सटाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हींग व प्रिंटिंग पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविलेल्या आहेत. त्यामध्ये कार्पेट, बेडशीट, पडदे, साडी, ड्रेस इत्यादीवर नावीन्यपूर्ण डिझाईन पहावयास मिळतील.

याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचीही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत. सर जेजे स्कुल ऑफ आर्टच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारतीमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन लावण्यात आले आहे.

सोबत १५ मार्च ते २१ मार्च या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ते सर्वांसाठी विनामूल्य आहेत.

दि. १५ मार्च २०२३ सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शो

दि. १६ मार्च २०२३ दुपारी २.०० ते ४.३० या कालावधीमध्ये प्रकाश सोनावणे यांचे व्यक्तिचित्र आणि शशांक म्हशीळकर यांचे व्यक्ती शिल्पाचे प्रत्येक्षिक होणार आहे . 

सायंकाळी ५.०० ते ६.३० वा. राजेंद्र पाटील यांचे रचना चित्र या विषयावर प्रात्यक्षिक होणार आहे  संध्याकाळी ६.३० ते ८.०० वा. पंडित. उपेंद्र भट यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे.

दि. १९ मार्च २०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वा. कलावेध कार्यशाळा आणि निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १९ ते २१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये  जेजे आर्ट्स च्या माजी विद्यार्थ्यांतर्फे सिरॅमिकच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कलारसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी  क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here