४ महिन्यांत १५ लाख ग्राहकांची चलो अँपला पसंती

@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमाने ‘चलो अँप’द्वारे (BEST Chalo App) वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याची सुविधा बुधवारपासून उपलब्ध केली आहे. त्यामुळे बेस्ट वीज विभागाच्या १० लाख ५० हजार वीज ग्राहकांना (BEST power consumers) या अँपद्वारे घरबसल्या वीज बिल भरणे सहज शक्य होणार आहे.

विशेष बाब म्हणजे बेस्टच्या या ‘चलो अँप’ ला जानेवारीपासून ते आतापर्यंत म्हणजे गेल्या चार महिन्यांत तब्बल १५ लाख ग्राहकांनी पसंती दिली आहे. तर, दोन लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी बेस्ट चलो कार्डची (BEST Chalo Card)खरेदी केली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

या ‘चलो अँप’ च्या सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत असून सुट्ट्या पैशांची अडचणही दूर होण्यास मोठी मदत होत आहे. जानेवारी महिन्यात सुरु केलेल्या ‘चलो अँप’ ला प्रवाशांचा लाभलेला चांगला प्रतिसाद पाहता वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी “चलो अँप”ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी, “चलो अँप” सुलभ व अधिक सोयीचे ठरणार आहे. बेस्ट उपक्रमाने “चलो अॅप” द्वारे ऑनलाइन वीज देयक प्रदानाचा पर्याय वीज ग्राहकांसाठी खुला केल्यामुळे त्यांना यापुढे वीज देयकाचे प्रदान करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वीज देयक भरणा केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.

वीज ग्राहकांनी “चलो अॅप” च्या मेनूबारवर जाऊन वीज देयकाचा पर्याय निवडावा. त्यानंतर ग्राहकाने वीज ग्राहक क्रमांक त्या ठिकाणी नोंद केल्यावर ऑनलाइन वीज देयकाचे प्रदान करता येईल, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

“चलो अॅप” द्वारे बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या रिचार्जची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चलो अॅपच्या वापरकर्त्यांना आता त्यांचा कार्ड क्रमांक नोंद करून कार्ड टॉप अप करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन रिचार्ज केलेले कार्ड बस वाहकाच्या मशीनद्वारे ऍक्टिव्हेट करता येईल, असेही ते म्हणाले. बेस्टने मुंबईकरांसाठी डिजिटल सेवा लोकार्पण करताना बेस्ट चलो अॅप, बेस्ट चलो कार्ड आणि नवीन ७२ प्रकारच्या बेस्ट सुपर सेवर वाहतूक योजना पुढे चला या मार्केटिंग मोहिमेद्वारे प्रवाशांच्या सेवेकरिता जारी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here